बाणेर येथील एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून धमकावल्याच्या आरोपावरून आमदार विनायक निम्हण, त्यांचा मुलगा नगरसेवक सनी निम्हण यांच्यासह तिघांवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निम्हण यांनीही या प्रकरणी या ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध त्यांच्या जागेत शिरून कुंपण तोडल्याबाबत तक्रार दिली आहे.
अरुण लक्ष्मण देशमुख (वय ५७, रा. बाणेर) यांनी निम्हण यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील सव्‍‌र्हे क्रमांक ३९ येथे देशमुख राहण्यास आहेत. त्यांच्या शेजारीच निम्हण यांची जागा आहे. या जागेचे कुंपण तोडल्याचा आरोप करीत निम्हण व इतरांनी देशमुख यांना मारहाण केली. ‘याच ठिकाणीच गाडून टाकू,’ अशी धमकीही दिली. या प्रकरणी विनायक निम्हण, सनी निम्हण व त्यांच्या मोटारीचा चालक यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३२३, ५०४, ५०६ कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी निम्हण यांनी पोलिसांकडे एक तक्रार दिली असून, अरुण देशमुख यांनी कुंपण तोडून त्यांच्या जागेत शिरण्याचा प्रयत्न केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार देशमुख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आमदार व त्यांच्या नगरसेवक पुत्रावर गुन्हा दाखल होण्याची घटना असल्याने त्याबाबत माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात येत होती. ज्या ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला, त्या चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून सुरुवातीला असा कोणताही गुन्हा आमच्याकडे दाखल नसल्याचे सांगितले जात होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडूनही दूरध्वनी घेण्यास टाळाटाळ केली जात होती.