कोव्हीशिल्ड या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा भाग म्हणून पहिल्या स्वयंसेवकाला बुधवारी पहिला डोस टोचण्यात आला आहे. भारती हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये नाव नोंदणी केलेल्या स्वयंसेवकाला ही लस टोचण्यात आली असून उर्वरित रुग्णालयांतील स्वयंसेवकांना आज लस टोचली जाण्याची शक्यता आहे.

सीरम इन्स्टिटय़ूट आणि ऑक्सफर्डतर्फे  तयार होत असलेल्या कोव्हीशिल्ड या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांची सुरुवात सोमवारी होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात नावनोंदणी के लेल्या स्वयंसेवकांच्या आवश्यक करोना आणि करोना प्रतिपिंड चाचण्या आणि इतर प्रक्रिया सोमवारी सुरू करण्यात आल्या. चाचण्यांचे अहवाल मंगळवारी संध्याकाळी उशिरा मिळाल्यामुळे मंगळवारी लस टोचणे शक्य झाले नाही.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले, ससूनमध्ये नावनोंदणी केलेल्या नऊ स्वयंसेवकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी एका स्वयंसेवकाला करोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. उर्वरित आठ स्वयंसेवकांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ते मिळताच बहुदा गुरुवारी (आज) निरोगी स्वयंसेवकांना लशीचा पहिला डोस टोचला जाईल.

पहिला डोस..

भारती हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या डॉ. सोनाली पालकर म्हणाल्या, करोना चाचणी केलेल्या स्वयंसेवकांपैकी एक स्वयंसेवक संपूर्ण निरोगी आढळल्यामुळे त्याला पहिला डोस टोचण्यात आला. उर्वरित स्वयंसेवकांच्या चाचण्यांचे अहवाल प्राप्त होताच पुढील प्रक्रिया पार पाडण्यात येईल. के ईएम रुग्णालयाच्या वढू केंद्रातील चाचण्यांविषयी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.