सोमवारपासून कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय

पुणे : मार्केटयार्डातील घाऊक भुसार बाजारातील व्यापाऱ्यांना पोलीस सहकार्य करत नसल्याने अशा परिस्थितीत भुसार बाजार बंद  ठेवणे योग्य ठरेल, असा निर्णय भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून (१३ एप्रिल) भुसार बाजारातील कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.

भुसार बाजार बंद ठेवण्यात आल्यानंतर शहरात अन्नधान्याचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात अन्नधान्याच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. बाजारातील कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना पोलीस सहकार्य करत नाहीत. त्यामुळे भुसार बाजारातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. ते म्हणाले, करोनाच्या संसर्गामुळे मार्केटयार्डातील घाऊक भाजीपाला, फळे तसेच कांदा-बटाटा विभागाचे कामकाज शुक्रवारपासून (१० एप्रिल) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत भुसार बाजारातील दैनंदिन गरज असलेल्या अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतला. घाऊक भुसार बाजाराचे कामकाज नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला होता. मात्र, भुसार बाजारातील व्यापारी आणि कामगार कामावर येताना त्यांची पोलिसांकडून अडवणूक होते. त्यांच्याकडे ओळखपत्र असताना पोलिसांकडून जाच होतो. एकीकडे प्रशासनाकडून अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू असताना बाजारघटकांची अडवणूक करणे योग्य ठरणार नाही.

पोलिसांच्या असहकार्यामुळे भुसार बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. टाळेबंदीत अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांची अडवणूक होत आहे. करोनाबधित भागात कठोर र्निबध घालण्यात आले आहेत. त्यामुळे गूळ-भुसार बाजारातील कामगारांना कामावर पोहोचता येत नाही, असे ओस्तवाल यांनी नमूद केले. याबाबत व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांना निवेदनही दिले आहे.

मुळ उद्देशाला हरताळ; मुख्यमंत्र्यांचे आदेश धुडकावले

करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना आश्वस्त केले. टाळेबंदीत कठोर र्निबध असले तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतील. तुटवडा जाणवणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश असताना पोलिसांनी पुणे शहरातील किराणा मालाची दुकाने सकाळी दोन तास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. वास्ताविक करोनाबाधित भागातील किराणामालाची दुकाने सकाळी दोन तास उघडण्याचे आदेश असताना पोलिसांनी त्यांच्या अधिकारात पुणे शहर तसेच उपनगरातील सर्व किराणा मालाची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर दूध डेअरी बंद ठेवण्याचे आदेश दिले.

आडमुठेपणा असा..

गुरुवारी रात्री बाजार समितीतील वरिष्ठ अधिकारी मोटारीतून मार्केटयार्ड परिसरातून जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांची मोटार थांबविली. अधिकाऱ्याने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे ओळखपत्र दाखविले. अत्यावश्यक  सेवेतील वाहनांना अडवणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा पोलिसांनी त्यांच्याकडे पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या डिजिटल परवान्याची मागणी केली. बाजार आवारात येणाऱ्या कामगार, व्यापारी, आडते यांना जिल्हाधिकाऱ्यांचे ओळखपत्र देण्यात आले असताना त्यांची अडवणूक होत आहे. पोलिसांचा परवाना अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लागू होत नाही. संचारबंदीत अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी पोलिसांचा परवाना आहे. मात्र, या परवान्याचे कारण दाखवून पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेतील सर्वाची छळवणूक होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

भाजीपाला बाजारातील उपबाजारही बंद

मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार बंद करण्यात आल्यानंतर शनिवारपासून (११ एप्रिल) मोशी, उत्तमनगर, मांजरी, खडकी या उपबाजारांचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.