पाच अरुंद रस्त्यांवरही आता सायकल मार्गांचे नियोजन

पुणे : स्वारगेट-खडकवासला या मार्गावर सायकल मार्ग अस्तित्वात येण्याची शक्यता नसताना या मार्गावर सायकल मार्ग विकसित करण्यासाठी पावणेदोन कोटींची उधळपट्टी करणाऱ्या महापालिके ने शहरातील पाच अरुंद रस्त्यांवरही सायकल मार्ग विकसित करण्याचा घाट घातला आहे. शास्त्री रस्ता, शंकरशेट रस्त्यासह उपनगरातील अरुंद रस्त्यांवर सायकल मार्ग विकसित करण्यासाठीची निविदा प्रक्रिया महापालिके च्या पथ विभागाकडून राबविण्यात आली आहे. या रस्त्यावरील अपुरी जागा लक्षात घेता सायकल मार्ग विकसित करणे जवळपास अशक्य आहे. मात्र या निमित्ताने सायकल मार्गाच्या नावाखाली महापालिके ची उधळपट्टी कायम असल्याचे दिसून येत आहे. सायकल योजना गुंडाळली असताना मार्ग कशासाठी असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

कर्वेनगर येथील वनदेवी मंदिर ते वांजळे चौक, पौड फाटा ते चांदणी चौक, लालबहादूर शास्त्री रस्ता ते दांडेकर पुलापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत आणि शंकरशेट रस्त्यावर सायकल मार्ग विकसित करण्याची कामे येत्या काही दिवसांत करण्यात येणार आहेत. शहरातील भाडेतत्त्वावरील सायकल योजना गुंडाळली गेली असतानाही सायकल मार्ग विकसित करण्याचा महापालिके चा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिके ने सायकल वापर करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत महापालिके ने सायकल एकात्मिक विकास आराखडा के ला आहे. हा आराखडा कागदावरच आहे. त्यातच स्मार्ट सिटी आणि महापालिके च्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेली भाडेतत्त्वावरील सायकल योजनाही गुंडाळली गेली आहे. मात्र के वळ अंदाजपत्रकात सायकल मार्ग विकसित करण्यासाठी तरतूद असल्यामुळे शहरात नव्याने सायकल मार्ग विकसित करण्याचे धोरण महापालिके ने स्वीकारले आहे.

दांडेकर पूल, लाल बहादूर शास्त्री रस्ता येथे सायकल मार्ग विकसित करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याची वस्तुस्थिती आहे. हेच चित्र शंकरशेट रस्त्याबाबतचे आहे. या रस्त्यावर उड्डाण पूल आहे. दांडेकर पूल, लालबहादूर शास्त्री रस्ता मुळातच वाहतुकीसाठी अपुरा ठरत आहे. या परिस्थितीत सायकल मार्ग कसे विकसित होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र के वळ उधळपट्टीसाठीच महाालिके चा हा खटाटोप सुरू असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट होत आहे.  शहरातील सायकल मार्गांची दुरवस्था आहे. ज्या ठिकाणी सायकल मार्ग आहेत, तेथे त्यांचा अपेक्षित वापर होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. अनेक सायकल मार्गांमध्ये सलगता नसून बहुतांश सायकल मार्गांवर विविध प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. गेल्या चार वर्षांत महापालिके ला जमेतेम २४ किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग विकसित करता आले आहेत. सातारा रस्ता, जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, कर्वेनगर रस्ता, कोथरूड या भागातील सायकल मार्गांचा वापर होत नसल्याचेही वेळोवेळी पुढे आले आहे. त्यानंतरही सायकल मार्ग उभारणीचा घाट महापालिके ने घातला आहे.

आदेश कागदावर

महापालिके चे चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. सध्या महापालिके चे उत्पन्न वाढत आहे. त्यामुळे उधळपट्टीही सुरू झाली आहे. सायकल मार्ग विकसित करणे, काँक्रिटीकरण, सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती, पदपथांचे विकसन अशा कामांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरुवात झाली आहे. सायकल योजना बंद पडली असतानाही के वळ उधळपट्टीसाठी सायकल मार्गांचे विकसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  करोना संसर्गामुळे कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा आणि अनावश्यक उधळपट्टीची कामे थांबवावी, हा महापालिका आयुक्तांचा आदेशही कागदावरच राहिला आहे.