भाजाच्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनीही व्यक्त केला. योग्य नियोजन, संघटनात्मक कामाची आखणी, प्रभागनिहाय लक्ष केंद्रित करून आणि प्रतिपक्षांचे बलाबल लक्षात घेऊन धोरण ठरविण्यात येत आहे. आमदार-खासदारांसह अन्य नेत्यांवर जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत, असं फडणवीस यांनी या निवडणुकीसंदर्भात काही दिवसांपूर्वी लोकसत्ताशी बोलातना स्पष्ट केलं होतं. मुंबई महापालिकेत शिवसेनेला दणका देण्याचे भाजपचे नियोजन आहे. केवळ मुंबईच नाही, तर अन्य महापालिकांमध्येही भाजपचाच महापौर सत्तेवर आणण्याचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही यश संपादन करू, असे फडणवीस यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. दरम्यान, भाजपा नेते आणि माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील आता मुंबई महानगरपालिका भाजपाच्याच ताब्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. पुण्यात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

“आम्ही मुंबई महानगरपालिका भाजपाकडे घेणार आहोत. मागच्या वेळी आम्ही जेव्हा ८२ जागा जिंकलो त्यावेळी महापौर आमचाच बसला असता. परंतु अमित शाह यांनी आपल्याला राज्य चालवायचं असून मुंबई महानगरपालिका शिवसेनेला सोडा असं सांगितलं होतं. शिवसेनेचे ८४ आणि आमचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. आमचे केवळ दोन नगरसेवक कमी होते,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरु केली असून बुधवारी मुंबईत भाजपाच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. बिहार निवडणुकीत भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहिल्यावर फडणवीस यांनी आता मुंबई महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आणण्याचा चंग बांधला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आणून दाखवू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र राजकीय वर्तुळामध्ये भाजपा एकटी लढणार की कोणासोबत युती करणार यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहेत.