News Flash

“माझं काही उद्धव ठाकरेंशी वाकडं नाही, पण…” चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी "सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को", असं म्हणत अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे.

changrakant patil on cm uddhav thackeray

तौते चक्रीवादळाच्या तडाख्यामध्ये कोकण किनारपट्टीवरील अनेक गावांमध्ये वित्तहानी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच चक्रीवादळाचा परिणाम म्हणून किनारी भागात वादळी पाऊस झाल्यामुळे रस्ते आणि विजेचे खांब उखडल्याचं पाहायला मिळालं. कोकणातल्या या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना केलेल्या कोकण दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यावरूनच आता भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करतानाच त्यांना खोचक सल्ला देखील दिला आहे. शरद पवारांनी लातूर भूकंपावेळी केलेल्या कामाची देखील आठवण चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे.

“उद्धवजी काही माझे दुश्मन नाहीत”

पुण्यात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावरून खोचक शब्दांमध्ये टीका केली. “मुख्यमंत्री म्हणतात, दोन दिवसांत पंचनामे करून मदत जाहीर करू. पण, दोन दिवसांत पंचनामे होण्यासाठी त्यांनी ३ दिवस तिकडे जायला हवं होतं. उद्धवजींशी माझं काही वाकडं नाही. ते काही माझे दुश्मन नाहीत. पण प्रशासन हे काठी घेऊन बसल्याशिवाय ताळ्यावर येत नाही. शरद पवार राजकीयदृष्ट्या आमचे कितीही विरोधक असोत. पण लातूरच्या भूकंपामध्ये शरद पवार लातूरमध्ये तंबू ठोकून राहिले. त्यामुळे तिथली परिस्थिती नियंत्रणात आली. एवढ्या मोठ्या संकटात ८ दिवस राहणं कठीण आहे. आता वादळ आल्यानंतर तिथली हवा बरी आहे. तुम्हाला प्रकृतीच्या समस्या आहेत तर तंबूत नका राहू. पण प्रशासनात भिती निर्माण व्हायला हवी, बघा मुख्यमंत्री बसले आहेत!”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“खरंच बेस्ट सीएम! चक्रीवादळालाही लाजवेल असा दौरा केलात”

“महाराष्ट्रात संजय राऊत आणि अजित पवार…”

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना देखील लक्ष्य केलं आहे. “महाराष्ट्रात संजय राऊतांनंतर अजित पवार आहेत की त्यांना सगळ्या विषयांवर मतं आहेत, सगळ्या विषयांवर मार्गदर्शन करायचं आहे. आणि सगळ्या विषयांवर विचारणा करण्याचा त्यांना अधिकार आहे. मला वाटतं की सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को असं झालंय. आपल्या पायाशी काय जळतंय ते बघा ना. माझं म्हणणं आहे की हा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देखील द्यावा की उद्धवजी ३ तास राहून काही होत नाही. ३ ते ४ दिवस राहा. त्यांनी स्वत:ही जाऊन राहावं. ते उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवारांनी आता तातडीने कोकणात जावं आणि त्यांच्या स्टाईलने ८ दिवस मुक्काम करून सगळे पंचनामे करून घ्यावेत. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईचे पैसे अजून मिळाले नाहीत. त्याचाही आढावा घ्यावा”, असं पाटील म्हणाले.

विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही – उद्वव ठाकरे

“…पण मोदींना काही फरक पडत नाही”

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलताना भावुक झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यावर विरोधकांनी खोचक टीका केली आहे. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राजकारणाची पातळी इतकी खाली गेली आहे की एखाद्या माणसाला मनापासून दु:ख झालं तरी तुम्ही त्याची चेष्टा करायची? पण मोदींना काही फरक पडत नाही. ते प्रतिक्रियाच देत नाहीत. तुम्ही कितीही प्रवृत्त केलं तरी ते प्रतिक्रिया देत नाहीत. ते म्हणतात मै काम करता रहूँगा”, असं पाटील म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2021 7:45 pm

Web Title: bjp leader chandrakant patil mocks cm uddhav thackeray deputy cm ajit pawar pmw 88
Next Stories
1 पुण्यात Black Fungus चा फैलाव; आत्तापर्यंत ३५३ बाधित तर २० मृतांची नोंद!
2 विरोधक ब्लॅक फंगस; शिवसैनिकांना सल्ला देताना राऊतांचा विरोधकांवर हल्ला
3 मोसमी पाऊस अंदमानात दाखल…
Just Now!
X