प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत शहर भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी (५ जून) महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता या महामेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.

बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या या महामेळाव्यास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, कौशल्य आणि उद्योजकता विकास राज्यमंत्री रणजित देशमुख, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे भाजपतर्फे सुरू करण्यात येत असलेल्या मोबाईल कार्यालयाचे उद्घाटनही शहा यांच्या हस्ते होणार आहे. जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने जनधन योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेची चार लाख खाती या वर्षअखेरीस काढण्यात येणार असल्याचेही गोगावले यांनी सांगितले.

प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत शहरात गेल्या आठ महिन्यांत पाच मतदारसंघात कल चाचणी आणि मुलाखत घेऊन १२० परीक्षार्थीची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक, मार्गदर्शक, शासकीय अधिकारी, बँकांचे अधिकारी आणि पक्ष कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत, असे सांगून गोगावले म्हणाले, या अभियानाला गती देण्याच्या उद्देशातून अमित शहा यांच्या उपस्थितीत महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हे अभियान प्रत्येक प्रभागात राबविण्यात येणार असून या वर्षअखेरीस १५ हजार प्रशिक्षणार्थीची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रशिक्षणार्थीना नोकरी आणि स्वयंरोजगारासाठी विविध कंपन्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. खेड शिवापूर येथील डब्ल्यूओएम कंपनीशी सरकारचा पहिला सामंजस्य करार होणार आहे.

‘राष्ट्रद्रष्टा’चे रविवारी प्रकाशन

पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी आणि एकात्म मानव दर्शन सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून साप्ताहिक विवेकतर्फे निर्मिती करण्यात आलेल्या ‘राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय’ या ग्रंथाचे रविवारी (५ जून) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास स्वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे उपस्थित राहणार आहेत. एक साक्षेपी संपादक, विचारवंत, संघ स्वयंसेवक, जनसंघाचे नेते असे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या द्विखंडात्मक ग्रंथातून उलगडण्यात आले असल्याची माहिती, ग्रंथ प्रकाशन समारोह समितीचे कार्यवाह धनंजय काळे आणि राहुल सोलापूरकर यांनी गुरुवारी दिली.