आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला, तरी शिवसेनेने कितीही प्रयत्न केले, तरी त्यांना स्वतंत्र लढता येणार नाही. सक्ती, दबाव अशा विविध बाबींचा वापर शिवसेनेवर होण्याची शक्यता आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे रविवारी केला. राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे आणि गणिते मांडण्याची वेळ आली आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

लोकनेते संभाजीराव काकडे गौरव समितीच्या वतीने संभाजी काकडे यांच्या गौरव सोहळ्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला. बिहारचे राज्यपाल डी. वाय. पाटील, महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. बाबा आढाव या वेळी उपस्थित होते.

सन्मानचिन्ह आणि मानचिन्ह देऊन काकडे यांचा सत्कार करण्यात आला. तर डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना शिवसेनेच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले पण भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेला जावेच लागेल. शिवसेनेकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी सक्ती आणि दबावाचा भारतीय जनता पक्षाकडून वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना निवडणूक स्वतंत्रपणे लढू शकणार नाही. शिवसेनेने कितीही प्रयत्न केला, तरी त्यांना बाहेर पडता येणार नाही. सध्या राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे आणि गणिते मांडण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान काकडे कुटुंबीयांबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले, ‘काकडे यांच्याशी अनेक दशकांचा स्नेह आहे.

राज्याच्या आणि दिल्लीच्या राजकरणात काकडे यांचे मोठे वजन होते. काही पंतप्रधानांबरोबरही त्यांचे घनिष्ट संबंध होते. उत्तम जनसंपर्कातून त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडविले. समाजकारणासाठी त्यांनी मंत्रिपदही नाकारले. त्यांच्या सारख्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यास देशाचे चित्र वेगळे दिसेल.’ कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा लोकप्रिय नेता म्हणून काकडे यांच्याकडे पाहिले जाते. सर्व पक्षातील कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे, असे बापट यांनी नमूद केले.

नवी ऊर्जा मिळाली 

या सत्काराच्या निमित्ताने नवी ऊर्जा मिळाली असून समाजसेवा करण्याची आणखी संधी मिळावी, अशी अपेक्षा संभाजी काकडे यांनी व्यक्त केली. देशातील परिस्थिती पाहता आपण कुठे जातो आहोत, याचा विचार करण्याची वेळी आली आहे, असेही त्यांनी सांगितले.