firasta-blog_ambar-karve-670x200
एखादी नोकरी इमानेइतबारे केलेला एखादा माणूस रिटायर झाल्यावर सहसा काय करतो?
असा सर्व्हे आधीच कधी केला असेल तर लक्षात येईल, रिटायर झालेले बहुतेक लोक एवढी वर्षे काम केल्यामुळेही असेल पण मनसोक्त आराम करतात. काहीजण देवधर्म, सत्संग करायला सुरुवात करतात. कोणी ‘सिनियर सिटिझन्स’ ग्रुपबरोबर देशविदेशात ट्रिप काढतात. काहीजण सकाळी नव्याने जमवलेल्या मॉर्निंग वॉकवाल्या ग्रुपबरोबर फिरून येताना चहासोबत, आपण गेले कित्येक वर्षे आपल्याच मुलाबाळांच्यासाठी किती कष्ट उपसले ते सांगत बसतात. त्यातून नोकरीमध्ये असताना एखाद्या महत्वाच्या संस्थेत कुठले जवाबदारीचे पद भूषवले असेल, तर मग विचारायलाच नको. मग कोणी स्वतः कन्सल्टंट म्हणून काम करत चार लोकांची काम करून देण्यात उर्वरित आयुष्यातही पैशाचा ओघ सुरूच राहील ह्याची खबरदारी घेतात.
वर सांगितलेल्या वर्णनाच्या जवळपासचे लोक आपण कायमच बघत असतो, खरं सांगायचं तर त्याला असलेले अपवादही अपवादानेच दिसतात. कारण जे खरे सेवाभावी काम करत असतात ते स्वतःच्या नावासाठी कामाचे कुठे प्रदर्शन करतच बसत नाहीत. रवींद्र कर्वे हे त्यातले मला पाहायला मिळालेले एक ठळक उदाहरण.
karveरवींद्र कर्वे ह्यांचा जन्म अलिबागजवळच्या अक्षी-नागाव गावातला. त्यांच्या लहानपणीच म्हणजे वयाच्या पाचव्याच वर्षी त्यांच्या वडिलांचे कर्करोगाने अकाली निधन झाले. आई आणि मोठे बंधू ह्यांनी घर सावरले. पुढचे शिक्षण रायगड जिल्ह्यातच महाडमधे झालं. कॉलेज जीवनात असताना त्यांचा संपर्क अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आला. पुढे परिषदेची चार वर्षे पूर्णवेळ काम करताना, ते मुंबई महानगर विभागाचे ते संघटन मंत्री आणि अखिल भारतीय कोषाध्यक्षही होते. त्याचा उपयोग त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागात पायपीट करत विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि राहण्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी केला. त्याच काळात ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात गावोगावी फिरून त्यांनी अनेक सामाजिक कामे केली. त्याबरोबर आदिवासी भागात ‘श्रमसंस्कार’ सारखी अनेक शिबिरे आयोजित केली आणि यशस्वीही केली. ह्याच सगळ्या काळात ‘टीम वर्क’चे महत्व त्यांना नकळतपणे समजले असावे. परिषदेत चार वर्षे पूर्ण झाल्यावर परत येताना परिषदेतले ज्येष्ठ कार्यकर्ते केशवराव केळकर ह्यांनी रवींद्र कर्वे आणि बरोबरच्या तरुण मुलांना मनातली ही सामाजिक कार्य करायची ज्योत कधीच विझून देऊ नका, अशीच तेवत ठेवा हा सल्ला दिला. तो न विसरता रवींद्र कर्वे ह्यांनी आपली नोकरी आणि संसार सुरु असतानाच सामाजिक कामात निरलसपणे आपले योगदान देणे सुरूच ठेवले. एकीकडे झोकून काम करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बँकेत त्यांच्याकडे मोठ्या जवाबदाऱ्या येतच गेल्या. ते स्वीकारत प्रत्येक पदावर त्यांनी बँकेसाठी योगदान दिले. एकेक पायरी चढत नोकरीची शेवटची तब्बल नऊ वर्षे ते बँकेच्या सर्वोच्च अशा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सीईओ पदावर कार्यरत राहिले. त्यातली शेवटची दोन वर्षे निश्चित विचार करून रिटायरमेंटनंतर त्यांनी वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रात काम करायचे निश्चित केलं.
२०१० मध्ये रिटायर झाल्यावरच्या कामाला त्यांनी सुरुवात केली ती मुंबईच्या कै. नाना पालकर स्मृती समिती ह्या संस्थेसाठी कार्याध्यक्ष म्हणून काम करण्यापासून. ह्या संस्थेचा इतिहास मोठा आहे. उद्दिष्टे संपूर्णपणे रुग्णसेवेला वाहिलेली आहेत. भारतातून दर महिन्याला दारिद्र्यरेषेच्या खालील शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मुंबईत परळ, शिवडी ह्या आसपासच्या भागात असलेल्या टाटा हॉस्पिटलसारख्या अनेक रुग्णालयात वाजवी दरात/मोफत आणि चांगले उपचार करून घ्यायला येतात. मुंबईत नातेवाईक, मित्र नसल्याने त्यांची राहायची सोय नसते. अश्या रुग्णांच्या सोयीसाठी ट्रस्टनी परळसारख्या मध्यवर्ती भागात स्वतःच्या मालकीची १० मजली इमारत बांधली आहे. तिथे रुग्ण आणि त्यांच्या एका नातेवाईकांच्यासाठी एक महिना मोफत राहायची सोय केलेली आहे. त्या बरोबरच रुग्णाच्या सोयीसाठी एका मजल्यावर सुसज्ज ‘डायलिसीस सेंटर’ आणि ‘पॅथॉलॉजी लॅब’ आहे. आजच्या घडीला मुंबईसारख्या शहरात केवळ ३५०/- रुपयात रुग्णांना उत्तम वातावरणात डायलिसीसची सोय ट्रस्टतर्फे केली जाते. एकूणच मुंबईत खूप आवश्यक आणि मोठे काम हा ट्रस्ट करतो. पण एवढे चांगले काम करणारा ट्रस्ट आर्थिकदृष्ट्या नुकसानीत सुरु होता. रवींद्र कर्वेंनी इथे काम करायला सुरुवात करायला सर्वप्रथम आर्थिक प्रश्नामध्ये लक्ष घातलं. त्यात सगळी कामे चांगली असली तरी त्यात सिस्टीम नसल्याची जाणीव झाली आणि त्यांच्यातल्या प्रशासकाने ती पारदर्शी सिस्टीम सर्वप्रथम निर्माण केली. प्रत्येक देणगीदाराला त्यांनी दिलेल्या पैशांचा दर महिन्याला हिशोब द्यायला सुरुवात केली. लवकरच पैशांची गरज संस्थेला नसून, संस्था करत असलेल्या कामांना आहे, हे संस्थेच्या कर्मचारी वर्गाला आणि आधारस्तंभ देणगीदार ह्यांना पटवून देण्यात ते यशस्वी झाले. ह्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि योग्य पद्धतीने हिशोब द्यायला सुरुवात केल्यामुळे ‘डायलिसीसच्या’ सुविधेमुळे संस्थेला दरवर्षी येणारी ३५ लाख रुपयांची तुट महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, एचडीएफसी बँक ह्यांच्या सौजन्याने पहिल्याच फटक्यात दूर केली. अशा एकेक अडचणी दूर करत मार्गक्रमण सुरळीत झालं. आत्तापर्यंत ह्या डायलिसीस सेंटरमध्ये १ लाख एवढी डायलिसीस झाली आहेत. कर्वे ह्यांनी ट्रस्टच्या कामात लक्ष घातल्यानंतर दरवर्षी होणाऱ्या नुकसानाऐवजी गेल्या ६ वर्षात संस्थेकडे जवळपास ५ कोटी रुपयांचा निधी जमा झालाय. आणि ट्रस्ट काही वर्षात स्वतःच्या पैशाच्या व्याजातून स्वतःचे उपक्रम स्वतः राबवू शकेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आतातर रुग्णांना दररोज सकस अन्न मिळावे ह्या उद्देशाने ५ रुपयांत नाश्ता आणि १०-१५ रुपयात जेवण अशी सोय त्यांनी गेल्या वर्षीपासून सुरु केली आहे. ट्रस्टची स्थिती सुधारत असतानाच कर्वे ह्यांनी गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण ह्या आपल्या दुसऱ्या विषयाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.
‘प्रत्येक कळीला फुलायचा अधिकार आहे’ हे ते आग्रहाने मांडतात. अशा गरजू मुलांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः विशिष्ट निकष तयार केले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलांना आणि देणगीदारांना एकमेकांची नावे ते सांगत नाहीत. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यामुळे मुलांच्यात आयुष्यभरासाठी येणारा आणि टिकून राहणारा मिंधेपणा. मुलांना मदत कोणी केली ह्यापेक्षाही अज्ञात व्यक्तीने मदत केल्याची भावना त्यांना शिकायला जास्ती भाग पाडते हे कर्वे ह्यांनी स्वतः अनुभवातून पाहिलेले होते. आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत नाही. मग मुलांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची माहिती असलेल्या शिक्षकांना स्वतः भेटून त्यांनी सुरुवातीला काही विद्यार्थ्यांच्या निवड केली. आणि त्यांना दरवर्षी शिक्षण आणि आवश्यक वरखर्चाला मदत मिळवून द्यायला सुरुवात केली. त्या विद्यार्थ्यांचा आलेला प्रतिसाद आणि त्यांना मिळालेले यश बघून, त्यांच्या शिक्षणावर होणाऱ्या पैशांचा हिशोब बघून देणगीदार आपणहून त्यांच्याकडे यायला लागले. मग योग्य मुलंमुली शोधून काढत, त्यांच्या आर्थिक आणि बौद्धिक स्थितीची स्वतः खात्री करून घेत कर्वे ह्यांचे हे दुसरे कामही जोरात सुरु झाले. तेही अतिशय उत्तम गुणांनी. ह्या मुलांना लावलेल्या निकषांमध्ये त्यांची जात, धर्म आडवा येत नाही. ज्यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, तरीही त्यांना शालेय, महाविद्यालयीन शिक्षणात उत्कृष्ट गुण आहेत फक्त असेच विद्यार्थी निवडले जातात. त्यांच्या शिक्षणावर अगदी कितीही खर्च झाला तरी तो केला जातो. सध्या महाराष्ट्रातल्या ११ जिल्ह्यातल्या जवळपास १२५ मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत सुरु आहे. खरंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बलपेक्षाही वाईट अवस्थेत असणारी ह्यातली काही मुले तर दहावीच्याही पुढे शिकू शकली नसती. तीच मुले आज नर्सिंग, फार्मसी, ऑटोमोबाईल इंजिनियरिंग, एमबीए, एमएससी,एम.फिल,पीएचडी आणि मुंबईत डॉक्टरी करण्यापासून पासून फ्रान्स, अमेरिकेत फिलाडेल्फिया, बॉस्टन ते अगदी केंब्रिजपर्यंतही पोचली आहेत. इथेही मुलांच्या प्रगतीची माहिती आणि त्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च वेळच्यावेळी देणगीदारांना मिळत असल्याने मदतीचा ओघ सुरूच आहे. त्यांच्या पारदर्शी काम करण्याच्या पद्धतीमुळे पैसे मागायला आपणहून कोणाहीकडे जायला लागत नाही हे ते आज अभिमानाने सांगतात. तरीही आत्तापर्यंत शिक्षणाच्या ह्या पवित्र कामासाठी पाच कोटीच्या आसपास रक्कम उभी करून गरजू मुलांची शिक्षणे त्यावर झाल्येत. यंदाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या, साधारण १२० विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जवळपास ५७ लाख रुपये देण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. त्यासाठी खऱ्या गरजू मुलांनी/पालकांनी त्यांच्याशी अवश्य संपर्क साधावा.
मुलांना ही मदत करताना ही कुठलीही भिक नसून,त्या मुलांनी ती पैसे कमवायला लागल्यावर पुढे अजून दोन मुलांना शिक्षणाला मदत करायची अट असते. ती शिक्षण पूर्ण झालेल्या मुलांनी पाळायला सुरुवातही झाली आहे. अगदी सध्या शिकत असलेल्या काहींनी गेल्यावर्षी वरखर्चाला दिलेली रक्कम वाचवून ह्या वर्षी आपली गरज कमी आहे असं सांगितले तर काहींनी कॉलेजतर्फे मिळालेली स्कॉलरशिप आपणहून कर्वे ह्यांच्याकडे इतर गरजू मुलांच्या शिक्षणासाठी सुपूर्त करून आत्ताच आपल्या दातृत्वाचा गुण दाखवून दिलाय. अशा आठवणी सांगताना रवींद्र कर्वे ह्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस आनंद दिसतो. साहजिकच आहे! आपल्या निरलसपणे केलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं त्यांना वाटत असणार. शेवटी निस्वार्थी वृत्तींनी काम करणाऱ्या माणसाचाही एवढा स्वार्थ असतोच ना?
– अंबर कर्वे

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Madhya pradesh beggar who faked disability in bhopal beaten by old man
Fake Beggars: पैशांसाठी अपंग असल्याचे नाटक; तोतया भिकाऱ्याला वृद्धाने दिला चोप; VIDEO होतोय व्हायरल
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?