‘फेसबुक’ या समाज माध्यमातून केलेले अनुभवकथन ‘रंगा’ या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीस येत आहे. दोन वर्षांतील या लेखनाला मिळणारा प्रतिसाद आणि ‘फ्रेंड लिस्ट’मधील मित्रांकडून झालेली मागणी ध्यानात घेऊन हे पुस्तक करण्याचा निर्णय
घेतला आहे.
हे लेखक आहेत श्रीरंग चितळे. कॉम्प्युटर चीप करणाऱ्या अमेरिकन कंपनीमध्ये काम करणाऱ्या चितळे यांनी गेल्या १५ वर्षांत ९३ वेळा परदेशवारी केली आहे. दोन वर्षांपासून कामानिमित्ताने आलेले अनुभव त्यांनी फेसबुकवर लिहिले. त्याला उदंड प्रतिसाद लाभला. हे लेखन अमृत पुरंदरे यांच्या वाचनामध्ये आले. चितळे आणि पुरंदरे हे पूर्वीपासूनचे मित्र. मात्र, या पुस्तकनिर्मितीच्या निमित्ताने त्यांच्यामध्ये लेखक आणि प्रकाशक हे नवे नाते निर्माण झाले. मॉडेल कॉलनी हॉल येथे रविवारी सायंकाळी सहा वाजता ‘रंगा’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ चित्रकार रवि परांजपे, डॉ. धनंजय केळकर आणि अभिनेते राहुल सोलापूरकर या वेळी उपस्थित राहणार आहेत.
या पुस्तकामागची कथाही तेवढीच रंजक आहे. चितळे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून मी फेसबुकवर लिहितो आहे. यामध्ये कॉपरेरेट क्षेत्रातील अनुभवांसह लोकांचे अनुभव समाविष्ट आहेत. त्यातून मानवी स्वभावाच्या छटा समजतात. या सर्व छोटय़ाशा कथा या सत्यघटना आहेत. हे लेखन माझ्या फ्रेंड लिस्टमधील मित्रांना आवडत गेले. एखाद्या मित्राशी गप्पा माराव्यात अशा स्वरूपाचे हे लेखन आहे. त्यामध्ये शेरेबाजी नाही. त्याचप्रमाणे कोणताही सल्ला देण्याच्या फंदात पडलो नाही.
फेसबुकवर असताना पुन्हा बुक का, असे मला अजून तरी कोणी विचारलेले नाही. किंबहुना तेथे लिहिलेले जर पुस्तक, ई-बुक किंवा ब्लॉग स्वरूपात संग्रहित झाले तर ते सुटसुटीत होईल, अशा सूचना आल्या.

माझ्या ‘वॉल’वर जाऊन दोनशे पोस्ट स्क्रोल करणे किंवा मी प्रत्येकाला मागणीनुसार टॅग करणे हा काही व्यावहारिक उपाय नव्हता. शिवाय एवढा वेळ, उत्साह आणि संयम कोणालाही नसतो. माझा महाराष्ट्र मंडळातील मित्र, लेखनाचा सजग वाचक आणि प्रकाशक अशा तिहेरी भूमिकेतून अमृत पुरंदरे याने पुस्तकाची निर्मिती केली आहे. कोणत्याही एका विषयावरचे पुस्तक नसल्यामुळे माझे मित्रमंडळीतील ‘रंगा’ हे नावच पुस्तकाचे शीर्षक झाले.
तुम्ही वाचन रंगी ‘रंगा’ असा अर्थ घेतला तर रंगा हे क्रियापद होते, असे पत्नीने मला सांगितले, असेही चितळे यांनी सांगितले.

वाचकांसाठी सवलत
पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी ‘रंगा’ पुस्तकाची एक प्रत शंभर रुपयांना मिळणार आहे. दोन प्रती दीडशे रुपयांना, तर पाच प्रती अडीचशे रुपयांना उपलब्ध होणार आहेत. एका व्यक्तीने पुस्तकाच्या दहा प्रती घेतल्या तर त्याला केवळ तीनशे रुपयांमध्ये ही पुस्तके देण्यात येणार असल्याचे अमृत पुरंदरे यांनी सांगितले. शेवटच्या पाच प्रती या प्रत्येकी दहा रुपयांनाच मिळणार आहेत. मात्र, ही ‘ऑफर’ केवळ त्या कार्यक्रमानंतर पुस्तक खरेदी करणाऱ्यांनाच मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.