|| विद्याधर कुलकर्णी

किमती आटोक्यात ठेवण्याचे प्रकाशकांचे प्रयत्न

नोटाबंदीनंतर आता वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) पुस्तके महाग झाली आहेत. जीएसटीतून पुस्तकांना वगळले असले तरी पुस्तकनिर्मिती करण्यासाठी आवश्यक सेवा देणाऱ्या घटकांना जीएसटी भरावा लागत असल्याने प्रकाशन व्यवसायापुढील आव्हाने वाढली आहेत. या अडचणींवर मात करताना वाचकांकरिता पुस्तकाच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रकाशकांचे प्रयत्न सुरू आहेत.

जागतिक कीर्तीचे नाटककार शेक्सपिअर यांचा जन्मदिन २३ मे हा जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून बहुतांश सर्व प्रकाशकांनी पुस्तकांच्या खरेदीवर खास सवलत जाहीर केली आहे. नोटाबंदी झाल्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून अडचणीत असलेल्या प्रकाशन व्यवसायाला आता जीएसटीचा फटका बसला आहे. पुस्तकांना जीएसटी लागू करण्यात आला नसला तरी पुस्तकनिर्मितीसाठी कागद खरेदी, छपाई आणि बाईंडिंग या सेवा ज्यांच्याकडून घेतल्या जातात त्या सर्व घटकांना जीएसटी भरावा लागतो. हा जीएसटी प्रकाशकांकडून वसूल केला जातो. लेखक आणि चित्रकाराला मानधन देताना त्यावरही प्रकाशकाला जीएसटी भरावा लागतो. मात्र, प्रकाशकांना जीएसटी लागू नसल्याने त्यांना या भरलेल्या जीएसटीचा परतावा मिळत नाही. या साऱ्याचा परिणाम पुस्तकांच्या किमती महाग होण्यावर झाला आहे.

पुस्तके महाग झाली हे खरे असले तरी सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या पुस्तकांच्या किमतीवर कोणताही परिणाम झालेला नाही. नव्या पुस्तकांच्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ होईल, याकडे पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे यांनी लक्ष वेधले. बाजारात जुनी पुस्तके सध्या असलेल्या दरामध्येच उपलब्ध आहेत. त्यावर वाढीव किमतीचे स्टिकर लावण्यात आलेले नाही. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका प्रकाशन व्यवसायाला बसला. एक तर आधीच पुस्तकांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यामध्ये जीएसटीची संक्रात आल्याने प्रकाशकांचे कंबरडे मोडले गेले आहे, असे त्यांनी सांगितले.

पुस्तकनिर्मितीचे खर्च वाढले आहेत. कागद खरेदी, छपाई आणि बाईंडिंग या सेवा ज्यांच्याकडून घेतल्या जातात त्यांना जीएसटी द्यावा लागतो. त्याचा परिणाम पुस्तकाच्या किमतीमध्ये काही अंशी वाढ होण्यावर झाला आहे. मात्र, वाचनसंस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध असलेले प्रकाशक पुस्तकांच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर यांनी सांगितले. वाचकांनी पुस्तके खरेदी करून भेट दिल्यास वाचनसंस्कृती वाढीस लागेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

‘आणि ग्रंथोपजिविये’

‘ज्यांचे ग्रंथांवर जीवन आहे ते सारे सुखी होवोत’ म्हणजेच ‘आणि ग्रंथोपजिविये’ अशी प्रार्थना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पसायदानातून केली आहे. मात्र, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे वास्तव वेगळेच दिसत आहे. शासन पातळीवर प्रयत्न होण्याबरोबरच वाचकांनी पुस्तकांच्या खरेदीचा संकल्प केला पाहिजे, असे अरुण जाखडे यांनी सांगितले. वाचक डिटिजल माध्यमावर गेला असल्याचा परिणाम पुस्तक विक्रीवर झाला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.