थकित महागाई भत्ते आणि सहावा वेतन आयोग लागू होण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी कुटुंब कल्याण कर्मचाऱ्यांनी रविवारी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोहिमेच्या पहिल्या सत्रात या कर्मचाऱ्यांनी पुण्यात ८० पोलिओ बूथवर काम करून १५ हजार बालकांना पोलिओ डोस दिले होते. दुसऱ्या सत्रात मात्र हे कर्मचारी काम करणार नसल्यामुळे या मोहिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय कुटुंब कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यभरात मिळून स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कुटुंब कल्याण केंद्रात काम करणारे २५० कर्मचारी असून यात ९५ टक्के महिला आहेत. १९ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा पार पडला. या वेळी या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले होते. ‘या कर्मचाऱ्यांना २००४ पासून एकही महागाई भत्ता मिळालेला नसून असे १९ महागाई भत्ते थकीत आहेत. तसेच त्यांना सहावा वेतन आयोगही लागू करण्यात आलेला नाही. गेली दहा वर्षे वेतनात अजिबात वाढ होत नसल्यामुळे कुटुंब कल्याण केंद्रांतील कर्मचारी काम सोडून चालले असून या संस्था मृतप्राय होण्याच्या मार्गावर आहेत,’ असे दीक्षित यांनी सांगितले.