बीएसएनएलची मोबाइल व इंटरनेट सेवा रविवारी सकाळपासूनच विस्कळीत झाल्याने मोबाइलधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. दुपारनंतर सेवा पूर्ववत झाली असली, तरी काहींना इंटरनेट सेवेबाबत अडचणी येत होत्या. मोबाइल नेटवर्कमध्येही मागील दोन ते तीन दिवसांपासून अडचणी येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत.

रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच बीएसएनएलची मोबाइल सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे मोबाइलवर संपर्क साधण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्याचप्रमाणे इंटरनेट सेवेतही अडथळे निर्माण झाले होते. सकाळी सहानंतर मात्र सर्वच सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे मोबाइलवरून संपर्क बंदच झाला होता. इंटरनेट सेवाही पूर्णपणे बंद झाल्याने व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक त्याचप्रमाणे इंटरनेट मोबाइलवर वापरणाऱ्यांची गैरसोय झाली.

अनेक ग्राहकांनी बीएसएनएलच्या ग्राहक सेवा केंद्रात संपर्क साधला. ग्राहक सेवा केंद्रामध्ये मात्र बीएसएलएनच्या माध्यमातून दूरध्वनी लागत होते. सेवा ठप्प झाल्याबाबत या ठिकाणी नागरिकांनी तक्रारी नोंदविल्या. मात्र, मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली असल्याने ती दूर करण्यासाठी काही वेळ लागणार असल्याचे उत्तर ग्राहकांना देण्यात येत होते.

दुपारी दोननंतर हळूहळू सेवा पूर्ववर होऊ लागली. मात्र, संध्याकाळी उशिरापर्यंत मोबाइल संभाषणात अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली.