पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पावरही आता पुणे महानगरपलिकेने छाप पाडली आहे. मनपाच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच विद्यापीठाच्या अर्थसंकल्पातही तरतुदींची खैरात करायची आणि पुढे अंमलबजावणी मात्र काहीच नाही, अशी परिस्थिती दिसत आहे. स्थावर विभागाच्या अनेक रखडलेल्या योजनांसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पातही मोठय़ा तरतुदी करण्यात आल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.
पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात होणाऱ्या अधिसभेसमोर ठेवला जाणार आहे. व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिलेल्या अर्थसंकल्पामध्ये या वर्षीही भल्यामोठय़ा तरतुदी करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी विद्यापीठाने ५२९ कोटी रुपयांचा आणि ११७ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प जाहीर केला होता. स्थावर विभागाच्या अनेक प्रकल्पांसाठी गेल्या अर्थसंकल्पात मोठय़ा तरतुदी करण्यात आल्या होत्या. मात्र, अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या तरतुदींची कामे प्रत्यक्षात मात्र आलेली नाहीत. स्थावर विभागाच्या अनेक प्रकल्पांची कामे फारशी पुढे सरकलेले नाही. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये क्रीडा संकुलासाठी ५ कोटी रुपये, विद्यार्थी सुविधा केंद्रासाठी ८ कोटी रुपये, मुलांच्या नव्या वसतिगृहासाठी २ कोटी रुपये, मुलींच्या वसतिगृहासाठी २५ लाख रुपये, वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना गिझर, बॉयलर, पंपसेट, करमणुकीची साधने, सौर ऊर्जा प्रकल्प अशा सुविधांसाठी २० लाख रुपये, भोजनगृहामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातील बहुतेक प्रकल्प हे अद्याप कागदावरच आहेत. व्हच्र्युअल क्लासरूमसाठी गेल्यावर्षी ५ कोटी रुपयांची तरतूद गेल्यावर्षी करण्यात आली होती. मात्र, अजून त्याचेही काम मार्गी लागलेले नाही.
वसतिगृह आणि भोजनगृहाबद्दल विद्यार्थ्यांच्या तक्रारी कायम आहेत. क्रीडा संकुलाची प्रगती ही अजूनही भूमिपूजनावरच आहे. विद्यार्थी सुविधा केंद्र दोन वर्षांपूर्वी तात्पुरते उभे करण्यात आले असले, तरीही त्याच्याही कायमस्वरूपी इमारतीबाबत फारशी प्रगती नाही. याशिवाय भाषा भवन, कॅप भवन यांसाठी नुसत्याच तरतुदी, प्रगती मात्र काहीच नाही. अशीच परिस्थिती आहे. संशोधनांसाठी करण्यात आलेल्या विभागवार तरतुदींचाही वापर झाला नसल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे विद्यापीठाचा या वर्षीचा अर्थसंकल्पही ‘मागील पानावरून पुढे..’ अशाच प्रकारचा राहणार असल्याची चर्चा विद्यापीठात आहे.