गुन्हेगारीवर आधारित असलेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटात कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचं आपण पाहिलं आहे, याचाच प्रत्यय वारंवार सध्या पिंपरी-चिंचवड शहरात येत आहे. शहरातील दापोडी येथे तरुणांनी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचं समोर आले आहे. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी उशिरा का होईना मात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. मात्र, अद्याप मुख्य आरोपी फरार आहे. तर, त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.

समीर सियाज बागसिराज (२०) आणि सोहेल शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही दापोडीत वास्तव्यास आहेत. आरोपी समीर याला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

‘भाई का बड्डे’ असं म्हणत सध्याचे तरुण कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करताना अनेक वेळा पाहायला मिळत आहे. हे वेड सर्वाधिक पिंपरी-चिंचवड शहरात दिसून येतेय पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी यावर कडक पाऊल उचलण्याची ताकीद वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेली आहे. मात्र, तरीही दापोडी येथे बिनधास्त होऊन काही जणांच्या टोळक्याने वाढदिवस साजरा केल्याचं समोर आले आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ समोर आला असून भोसरी पोलीस बर्थडे बॉयचा शोध घेत आहेत.

सोहेलचा वाढदिवस असल्याने मित्र समीर याने सर्व नियोजन केले होते. त्यानुसार ठीक बाराच्या सुमारास सोहेलने काही मित्राच्या उपस्थित कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी सोहेल आणि समीर हे दोघे ही कोयत्याने अक्षरशः केकचे तुकडे करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. केक कापून झाल्यानंतर कोयता दापोडीच्या बस स्थानकात लपवून ठेवण्यात आला. भोसरी पोलिसांनी उशिराने कारवाईला सुरुवात केली. यावेळी समीरला शोधण्यात त्यांना यश आले आहे. इतर मात्र फरार झाले आहेत. सध्या पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.