सनदी लेखापालांची संतप्त प्रतिक्रिया

पुणे :  सनदी लेखापालांच्या व्यासपीठावर येऊन त्यांच्याच कार्यपद्धतीवर देशाचे पंतप्रधान शंका घेत अविश्वास दाखवित असतील तर सनदी लेखापालांनी काय करावे? असा संतप्त सवाल सनदी लेखापालांकडून उपस्थित करण्यात आला आहे. हिशोब तपासणी ही व्यवहारानंतरच होते. त्यामुळे पैशांच्या गैरव्यवहाराचा आणि सनदी लेखापालांचा संबंध काय, त्यांना अटक का व्हावी, सनदी लेखापालांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा असताना आणि कंपनी कायदा, सेबी, सनदी लेखापाल संघटना गैरप्रकाराची दखल घेत असताना पोलीस कारवाई का होते, असे प्रश्न उपस्थित करत पोलिसांकडून सूडबुद्धीने कारवाई होत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सनदी लेखापालांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे यांना अटक केल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. घाटपांडे हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी संबंधित आहेत. ते या संस्थेचे लेखापरीक्षक आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही संघ परिवाराशी संबंधित संस्था असून घाटपांडेही संघ परिवाराशी निगडित आहेत.

डी. एस. कुलकर्णीकडून कर्ज वसुली सुरू झाली आहे. हिशोब तपासणी ही व्यवहारानंतरच होते. त्यामुळे गैरव्यवहार आणि लेखापाल यांचा संबंधच येत नाही. मग त्यांना अटक कशासाठी व्हावी, असा प्रश्न सनदी लेखापाल चंद्रशेखर चितळे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, ‘हिशोब तपासणी करताना काही चूक झाल्यास त्यासाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणा केली आहे. कंपनी कायदा, सेबी आणि सनदी लेखापालांची संस्थांकडून चुकीची दखल घेतली जाते. त्यामुळे चौकशीशिवाय अटक करणे म्हणजे गुन्हा सिद्ध न होताच शिक्षा करण्या सारखा हा प्रकार आहे. तीन ते चार वर्षांनी सनदी लेखापालांची चूक नसल्याचे निष्पन्न होते. पण त्यांच्या अटकेने झालेले नुकसान कसे भरून निघणार ? ’

यासंदर्भात बोलताना सनदी लेखापाल आणि कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे म्हणाले,की सनदी लेखापालांची जबाबदारी ही मर्यादित असते. गैरव्यवहाराला सनदी लेखापालांना कोणत्याही प्रकारे जबाबदार धरता येत नाही. देशपातळीवरील संघटनेचे सनदी लेखापालांवर नियंत्रण असते. सनदी लेखापालांवर पोलीस कारवाई होणे, हा प्रकारच चुकीचा आहे.

‘बँक ऑफ महाराष्ट्र प्रकरणात सनदी लेखापालाला झालेल्या अटकेला दोन बाजू आहेत. एक म्हणजे थेट लेखापालाला अटक झाल्यामुळे लेखापालांच्या वर्तुळात नाराजी आहे. मात्र जर सनदी लेखापाल या प्रकारात दोषी आढळल्यास त्याच्यावरती संघटनेच्या शिस्तपालन समितीकडून कारवाई केली जाईल,’ अशी प्रतिक्रिया इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष आनंद जखोटिया यांनी व्यक्त केली.