पिंपरी-चिंचवडला २० ठिकाणी लसीकरण केंद्र
लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : महापालिकेच्या आठ रुग्णालयांसह १२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, करोना चाचणीसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील प्रयोगशाळा २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहे.
महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात करोनाविषयक आढावा बैठक झाली. आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे आदी उपस्थित होते. या वेळी वाढत्या रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त करतानाच करोनाविषयक बाबींना प्राधान्य देण्याचा निर्णय झाला. यशवंतराव चव्हाण रुग्णालय, नवीन भोसरी रग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, यमुनानगर, कासारवाडी व पिंपळे निलख दवाखाना, चिंचवडचे कामगार रुग्णालय या आठ ठिकाणी पालिकेने लसीकरण सुविधा केली आहे.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, करोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यानुसार, करोनाच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. चव्हाण रुग्णालयात २४ तास चाचण्या करण्यात येतील. करोना रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा महापालिकेकडे उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार, खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यात येतील. महापौर ढोरे म्हणाल्या, खासगी रुग्णालयांचे दर सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये अद्ययावत सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.