छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा स्वाभिमान आहेत. भारतीय जनता पक्षासाठी महाराजांचे स्थान नेहमीच पूजनीय आहे. श्रीपाद छिंदम याने केलेले विधान आक्षेपार्ह असून त्या विधानाचा आणि भारतीय जनता पक्षाचा संबंध जोडणे बालिशपणा आहे. पक्षाने छिंदमला पदावरून बडतर्फ करीत पक्षातून तात्काळ बेदखल केले आहे, अशी वृत्ती समाजाला व पक्षाला घातक असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार साबळे यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना केली.

अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. छिंदम हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे विरोधकांनी पक्षावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर खासदार साबळे यांनी आपली भूमिका मांडली.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला अटक करण्यात आली आहे. अहमदनगरचे उपमहापौर असलेल्या छिंदम यांनी शिवाजी महाराजांबाबत कसे अपशब्द काढले याची एक ऑडिओ क्लिप शुक्रवारी व्हायरल झाली. ज्यानंतर भाजपाने त्यांचा राजीनामा घेत पक्षातून हकालपट्टीही केली. त्यानंतर छिंदमना अटक करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदम कारने पळून जात होते त्यावेळी सोलापूर रोड भागात असलेल्या शिवाराचाही आधार त्यांनी लपण्यासाठी घेतला. मात्र, नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि पोलिसांना बोलावले. ज्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छिंदमना अटक केली.

सोमवारी शिवजयंती असल्याने राज्यात उत्साहाचे वातावरण आहे अशात अहमदगरमध्येही शिवजयंतीची तयारी सुरु होती. मात्र, महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यासोबत फोनवर बोलताना छिंदम यांनी शिवाजी महाराज आणि शिवजयंती याबाबत अत्यंत हीन दर्जाचे शब्द वापरले. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अहमदनगरमध्ये तणाव निर्माण झाला तसेच औरंगाबादमध्येही या प्रकरणाचे पडसाद उमटले.