गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून ७५ जणांना साडेसात कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजेश दिनकर कांबळे (रा. क्लाऊड नाईन सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा), अमोल शहा (रा. हडपसर), अजय देसाई (रा. कात्रज) आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आबिद शेख (वय ४५, रा. हिलमिस्ट सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी इन्व्हॉल्व कन्सल्टन्सी कंपनी स्थापन केली होती. आकर्षक व्याज देण्याच्या आमिषाने त्यांनी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले. सुरुवातीला कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांना परतावा दिला. शेख आणि त्यांच्या नातेवाईकांनी जवळपास १ कोटी ८७ लाख रुपये कांबळे याच्या कंपनीत गुंतविले होते.

गेल्या काही महिन्यांपासून कांबळे याने परतावा देणे बंद केले होते. त्यामुळे शेख यांच्यासह ७५ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदविली. या गुन्ह्य़ात कांबळे याच्या पत्नीचा सहभाग असून त्यांनी सुमारे तीनशेजणांना गंडा घातल्याचा संशय पोलिसांना आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.पी.वळवी तपास करत आहेत.