देशभरात विविध ठिकाणी मॅगी न्यूडल्समध्ये दोष आढळल्याने तेथील सरकारने कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील मोठय़ा शहरांमधून मॅगीचे नमुने तपासणीसाठी पुण्यामध्ये आणले आहेत. त्याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी अथवा शनिवारी मिळेल. या अहवालामध्ये दोष आढळल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करू, असे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी सांगितले. मात्र, मॅगीवर सध्या तरी राज्यात बंदी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्ली आणि केरळमध्ये मॅगीवर १५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. बिहार न्यायालयानेदेखील कारवाईचे आदेश दिले आहेत.  त्या पाश्र्वभूमीवर राज्यातील मॅगीच्या तपासणीसंदर्भात विचारले असता बापट म्हणाले,की महाराष्ट्रामध्ये मॅगीचे उत्पादन होत नाही. अन्य राज्यांमध्ये ते होत असले तरी त्याचे कालावधीनुसार वर्गीकरण केले जाते. दिल्लीमध्ये दहा ठिकाणच्या तपासणीमध्ये मॅगी खाण्यायोग्य नसल्याचे आढळून आल्याने तेथे बंदी आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, नागपूर यांसारख्या मोठय़ा शहरांमधून मॅगीचे नमुने मागविण्यात आले आहेत. त्याची तपासणी पुण्यातील प्रयोगशाळेमध्ये सुरू आहे. या अहवालामध्ये काही दोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात येईल.
मोनोसोडियम ग्लुटामेट आणि शिसे यांचे प्रमाण किती असावे याबाबत अन्न सुरक्षा कायद्यामध्ये नियम आहेत. मात्र, त्याचे प्रमाण वाढले तर ते शरीरास अपायकारक आहे. पुणे आणि गझियाबाद येथील प्रयोगशाळा अशा तपासणीसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. विभागाने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीचे नमुने पाठविले आहेत. पुणे विभागात ज्या ठिकाणाहून मॅगीचे नमुने घेतले आहेत त्या विक्रेत्यांना विक्री बंद करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असेही बापट यांनी सांगितले.

मॅगी खरेदीवर बहिष्कार टाकावा
मॅगी खरेदीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी केले आहे. जोपर्यंत मॅगी आरोग्यास अपायकारक नाही हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ग्राहक पेठ मॅगीची विक्री करणार नाही. सुज्ञ पालकांनीही तूर्त मॅगी खरेदी करू नये किंवा खाद्यपदार्थ म्हणून त्याचा वापर करू नये, असे पाठक यांनी कळविले आहे.