शिरूर लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. राज्य शासनाने या प्रश्नांचा पाठपुरावा करावा, अशी मागणी आढळरावांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर ते शिरूरपर्यत सहा पदरीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्राधान्याने हाती घ्यावे. त्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करावा. काही वर्षांपासून बंद असलेला थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा, त्यासाठी आवश्यक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात थिटेवाडी, कळमोडी उपसा सिंचन पाणी योजना राबवण्यात यावी, तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात यावे. कळमजाई जलसिंचन परियोजनेअंतर्गत आदिवासी भागातील गावांना डिंभे धरणातील पाणी शेतीसाठी मिळण्यासाठी उपसा सिंचन योजना राबवावी, तसे आदेश संबंधितांना द्यावे.

शिवनेरी किल्ल्यावरील अंबारखाना इमारतीमधील प्रस्तावित सातवाहन आणि शिवकालीन संग्रहालयास मंजुरी मिळावी. जुन्नर तालुका पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात यावा, त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात यावा, अशा विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत.