आजपासून अंशत: ढगाळ स्थितीमुळे परिणाम

पुणे : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यामध्ये कधी ऊन, तर कधी पाऊस अशा प्रकारच्या हवामानाचा अनुभव पुणेकरांनी घेतल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात तापमानात वाढ होत असतानाच ९ एप्रिलपासून पुन्हा ढगाळ स्थिती निर्माण होत आहे. परिणामी रात्रीच्या उकाडय़ात वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसाचे कमाल तापमान मात्र सरासरीच्या आसपास राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी (८ एप्रिल) शहरातील दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात एकदमच मोठी घट होऊन ते सरासरीच्या खाली आले होते.

पुणे शहर आणि परिसरामध्ये मार्चच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये पावसाने तडाखा दिला. दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस झाला. करोनाचा कहर सुरू असताना पावसाळी हवामान झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, एप्रिलच्या पहिल्याच दिवसापासून दिवसाच्या कमाल तापमानात वाढ सुरू होऊन पावसाळी स्थिती निवळली. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ामध्ये बहुतांश वेळेला दिवसाच्या तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे राहिला. मात्र, याच कालावधीत दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात कमी-अधिक प्रमाणात चढ-उतारही दिसून आले. गेला आठवडाभर शहर आणि परिसरात निरभ्र आकाशाची स्थिती होती. त्यामुळे उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढला होता. मंगळवारी (७ एप्रिल) शहरातील तापमानात काही प्रमाणात घट दिसून आली.  ३७.९ अंश कमाल, तर १८.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली. दुसऱ्या दिवशी गुरुवारी तापमान आणखी घसरले. ३५.९ अंश कमाल, तर १६.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली. तापमान सरासरीच्या खाली आल्याने उन्हाचा चटका काहीसा घटला होता.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, ९ एप्रिलपासून शहर आणि परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. परिणामी तापमानात चढ-उतार होणार आहेत. या कालावधीत दिवसाचे कमाल तापमान काही प्रमाणात कमी राहील. ते ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. मात्र, रात्रीच्या तापमानात वाढ होऊन ते २१ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीच्या उकाडय़ात वाढ होऊ शकते.

 

तापमानातील चढ-उतार

दिनांक    कमाल  किमान

२ एप्रिल    ३८.१   १८.६

३ एप्रिल   ३८.३   १८.४

४ एप्रिल  ३९.१   १८.९

५ एप्रिल   ३९.३   १९.३

६ एप्रिल   ३७.६   १९.४

७ एप्रिल   ३७.९   १८.४

८ एप्रिल   ३५.९    १६.४

(अंश सेल्सिअस)