मागील साडे तीन वर्षाच्या कालावधीत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुणे शहराचे चित्र बदलण्यासाठी अनेक प्रकल्प आणले असून पुण्याचे चित्र लवकरच बदलणार आहे. पुणे शहरात काही वर्षांपासून कचरा प्रश्नावर केवळ चर्चा केली जात होती. मात्र भाजप सरकार आल्यावर कचरा प्रश्न मार्गी लावला. तर महापालिकेच्या माध्यमातून कचर्‍यावर अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. ही चांगली बाब असून आता पुणे शहराला पाणी समस्येतून सोडविण्यासाठी लवकरच समान पाणी पुरवठा योजना पूर्ण होईल असो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कात्रज कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,मंत्री सुभाष देशमुख, महापौर मुक्ता टिळक,खासदार अनिल शिरोळे, स्थानिक आमदार योगेश टिळेकर, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे शहराचा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वारगेट येथे मेट्रो हब लवकरच करण्यात येणार आहे. शहरात मेट्रो लवकरच धावेल. त्यातील एक टप्पा शिवाजीनगर ते हिंजवडी असा मेट्रो मार्ग देखील पूर्ण होईल. या मेट्रो प्रकल्पातून पुणेकर नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर ते पुढे म्हणाले की, कात्रज कोंढवा अनेक वर्षापासून होत नव्हता. हा रस्ता होता कामा नये. यासाठी अनेक वेळा अडथळे आले तरी देखील आज या रस्त्याचे काम होत आहे. मागील काही वर्षात कात्रज कोंढवा रस्त्यावर अपघात झाले. मात्र आता हा रस्ता झाल्यावर अपघात मुक्त रस्ता होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिला.