25 February 2021

News Flash

विदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच

विदर्भातील गोंदिया येथे शुक्रवारी राज्यातील नीचांकी ६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली

(संग्रहित छायाचित्र)

उत्तर भारतातील थंडीची लाट पूर्व मध्य प्रदेशपर्यंत आली असल्याने त्यालगतच्या विदर्भातील भागांत कडाक्याची थंडी पडली आहे. उर्वरित राज्यात मात्र अद्यापही थंडीची प्रतीक्षा कायम आहे.

विदर्भातील गोंदिया येथे शुक्रवारी राज्यातील नीचांकी ६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उत्तर मध्य महाराष्ट्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या विरून गेले आहे. त्यामुळे रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हिमालयाच्या विभागात काही ठिकाणी सध्या हिमवृष्टी सुरू आहे. त्यामुळे उत्तरेकडील पंजाब, हरियाना, दिल्ली, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यांत सध्या थंडीची तीव्र लाट आहे. ही लाट थेट मध्य प्रदेशपर्यंत आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रावर दोन दिवस कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होता. याचा परिणाम म्हणून राज्यात बहुतांश भागातील तापमानात झपाटय़ाने घट होऊ शकली नाही.

विदर्भात मात्र निरभ्र आकाशाची स्थिती असल्याने तेथे तीन दिवसांपासून तापमानात घट दिसून येते. बहुतांश ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा खाली गेले आहे. गोंदियात थंडीच्या लाटेची स्थिती आहे. या भागातील रात्रीचे किमान तापमान सारसरीच्या तुलनेत ६.४ अंशांनी खाली आले आहे.

उत्तर भारतातील थंडीच्या लाटेची स्थिती तीन ते चार दिवस कायम राहणार आहे. या काळात राज्यात कोरडे हवामान राहणार आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. सध्या मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाडय़ातील रात्रीच्या किमान तापमानात गेल्या आठवडय़ापेक्षा घट असल्याने या भागात रात्री हलका गारवा आहे.

मुंबईत तापमानात घट

मुंबई शहर आणि उपनगरातील किमान आणि कमाल तापमानात शुक्रवारी पुन्हा घट झाली. उपनगरात काही ठिकाणी किमान तापमान १७ अंशापर्यंत घसरले. पुढील काही दिवस किमान तापमानात घट अपेक्षित असल्याचे हवामान विभागाने सांगितले. आठवडय़ाच्या सुरुवातीस वाढलेल्या तापमानात गुरुवारपासून घट व्हायला सुरुवात झाली. शुक्रवारी कमाल तापमान ३० अंश, तर किमान  २० अंशापर्यंत घसरले. उपनगरात पवई १६.९ अंश, कांदिवली १८.५ अंश आणि पनवेल येथे १७.५ अंश किमान तापमान नोंदविण्यात आले. काही ठिकाणी सकाळी थंड वारे सुटले होते. कुलाबा केंद्रावर २१ , सांताक्रूझ केंद्रावर १९.५ अंश किमान तापमान राहिले. तर कमाल तापमान २९ व ३०.१ अंश नोंदविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 12:42 am

Web Title: cold in vidarbha waiting elsewhere abn 97
Next Stories
1 ऑनलाइन शिक्षकांच्या मागणीत ३०० टक्के वाढ
2 रतन टाटांशी वयापलीकडच्या मैत्रीची गोष्ट
3 लॉकडाउनमुळे तुटलेलं ‘ते’ नातं पुणे पोलिसांमुळे पुन्हा जोडलं गेलं
Just Now!
X