पुणे : करोना नियंत्रणाच्या नावाखाली सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याच्या महापालिके च्या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गात असंतोष कायम असून त्याविरोधात गुरुवारी व्यापारी वर्गाकडून आंदोलन करण्यात आले. आदेश डावलून शुक्रवारी सकाळी दुकाने उघडण्यात येतील, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, आदेश झुगारून दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे.

करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शहरात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याअंतर्गत सायंकाळी सहा ते सकाळी सात या कालावधीत संचारबंदी आणि  सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त विक्रम कु मार यांनी काढला आहे. महापालिके च्या या निर्णयामुळे शहराचे अर्थचक्र ठप्प होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने तीव्र विरोध दर्शविला असून भाजप व्यापारी आघाडीने बुधवारी शहरातील दुकाने खुली के ली होती. त्यानंतर शहरातील व्यापारी वर्गाकडूनही शहरात दुकाने खुली करण्यासाठी आंदोलने सुरू झाली असून त्याअंतर्गत गुरुवारी पुणे व्यापारी महासंघाने विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे रहात महापालिके च्या निर्णयाचा निषेध नोंदविला आणि शुक्रवारी सकाळी आठ वाजता दुकाने खुली करण्यात येतील, असा इशारा दिला.

दरम्यान, व्यापारी महासंघाच्या या मागणीसंदर्भात बोलताना महापालिका आयुक्त विक्रम  कुमार यांनी दुकाने उघडण्यात आली तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका मांडली. जे व्यापारी नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे विक्रम  कुमार यांनी सांगितले.