12 July 2020

News Flash

शाळेतील विद्यार्थ्यांना आसाराम बापूंचे धडे

आसाराम बापूंच्या पुस्तकांवर आधारित ‘दिव्य प्रेरणा प्रकाश’ स्पर्धा शाळांमध्ये घेण्यासाठी शिक्षण विभागाकडूनच परवानगी देण्यात आली आहे.

लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली गजाआड असणाऱ्या आसाराम बापूंचे धडे आता शाळेतील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहेत. बापूंच्या संस्थेचे उपक्रम आणि बापूंच्या पुस्तकांवर आधारित ‘दिव्य प्रेरणा प्रकाश’ स्पर्धा शाळांमध्ये घेण्यासाठी शिक्षण विभागाकडूनच परवानगी देण्यात आली आहे.
लैंगिक शोषणाबरोबरच इतरही अनेक गुन्ह्य़ांसाठी आसाराम बापू देशभर गाजत आहेत. मात्र, बापूंच्या ‘दिव्य प्रेरणेची’ राज्याच्या शिक्षण विभागाला भूरळ पडल्याचे दिसत आहे. बापूंचे एकाग्रता, संयम, सदाचाराचे धडे शाळेतील विद्यार्थ्यांनाही मिळावेत असा प्रयत्न राज्याचा शिक्षण विभागच करत आहे. बापूंच्या संस्थेला आश्रय देत शिक्षण विभागाने बापूंना आदर्श वस्तुपाठाच्या पंक्तीतच बसवल्याचे समोर येत आहे. देशभर बापूंवर टीका होत असताना राज्याच्या शिक्षण विभागाने त्यांच्या संस्थेचे उपक्रम शाळांमध्ये चालवण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. राज्याच्या शिक्षण संचालनालयाकडून निघालेले परवानगी पत्र काही जिल्ह्य़ातील शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेही आहे.
आसाराम बापूंच्या भक्तांकडून ‘श्री योग वेदांत सेवा समिती’ चालवली जाते. या समितीचे उपक्रम आणि त्यांच्या स्पर्धा शाळांमध्ये घेण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. योग विद्येद्वारे एकाग्रता, संयम, सदाचार यांच्या प्रसारासाठी आता बापूंचे भक्त शाळांमध्ये उपक्रम घेण्यासाठी या संस्थेने राज्याच्या शिक्षण विभागाकडे परवानगी मागितली. बापूंच्या या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘दिव्य प्रेरणा प्रकाश’ पुरस्कारासाठी शाळांमध्ये स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. आसाराम बापूंनी लिहिलेल्या पुस्तकांवर ही स्पर्धा घेण्यात येते.
ही स्पर्धा घेण्यासाठी राज्याच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून विभागीय स्तरांवर पत्र पाठवण्यात आले आहे. ‘श्री योग वेदांत सेवा समिती’ यांच्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी दिव्य प्रेरणा प्रकाश प्रतियोगिता आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा घेण्यास ‘श्री योग वेदांत सेवा समिती पुणेच्या सदस्यांना सहकार्य करावे,’ असे पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्राचा संदर्भ देत पुणे विभागीय उपसंचालकांनी पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्य़ातील शिक्षणाधिकाऱ्यांना या स्पर्धाच्या आयोजनाबाबत पत्र पाठवले आहे. याबाबत राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

दिव्य प्रेरणा प्रकाश स्पर्धा काय आहे?
बापूंच्या संस्थेतर्फे देशभर ही प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येते. त्यासाठी या संस्थेकडून अभ्यासक्रमही निश्चित केला जातो. २०१३ मध्ये ही स्पर्धा बंद करण्यात आली होती. मात्र, या वर्षी पुन्हा एकदा स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बापूंच्या ‘बालसंस्कार’ या पुस्तकावर तर नववी दहावीसाठी ‘दिव्य प्रेरणा प्रकाश’ या पुस्तकावर आधारित प्रश्न विचारले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2015 3:27 am

Web Title: competition on asaram bapus books
टॅग Asaram Bapu
Next Stories
1 मुजुमदारवाडय़ातील गणेशोत्सवाचे अडीचशेव्या वर्षांत पदार्पण!
2 पुण्यात सप्टेंबरमध्ये स्वाईन फ्लूमुळे १० जणांचा मृत्यू!
3 स्वस्त विजेचा पर्याय असतानाही गणेश मंडळांकडून धोकादायक वीजजोड
Just Now!
X