राज्य लोकसेवा परीक्षेत पुण्यातील उमेदवार संदीप जाधव यांचा राज्यात दुसरा क्रमांक आला. हे समजताच पुण्यातील स्पर्धा परीक्षांचे क्लासेस आणि अभ्यासिका यांची धावपळ सुरू झाली. ही धावपळ होती, त्यांच्यावर हक्क सांगण्यासाठी! ‘ते आपलेच विद्यार्थी आहेत’ हे सांगण्यासाठी त्यांच्यात अहमहमिका सुरू झाली आहे. काहींनी तशी निवेदने प्रसिद्धीस दिली आहेत, तर काहींनी जाहिराती दिल्या आहेत.. पण गंमत अशी की संदीप तर म्हणतात, ‘मी कोणाचाच क्लास लावला नाही, स्वत:च अभ्यास करून यशस्वी झालो!’
पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसची एक मोठी बाजारपेठ उभी राहिली आहे. ‘आम्हीच कसे चांगले!’ हे पटवून देण्यासाठी क्लासेसचा आटापिटा सुरू आहे. पण या ‘चांगलेपणा’चा निकष कोणता?. हल्ली मानले जाते की, ज्या क्लासचे जास्तीत जास्त विद्यार्थी पदे मिळवतात तो क्लास चांगला. त्यामुळे सर्वच क्लासचालकांसाठी ‘आम्ही कसे चांगले’ हे दखवण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे निकाल ही नामी संधी असते. त्यात आपले विद्यार्थी येवोत अथवा न येवोत, ते कसे आपलेच आहेत, हे दाखवले जाते. संदीप जाधव यांच्यावर हक्क दाखवण्याच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा घडले.
या क्लासेसनी, संदीप जाधव हे आमच्याच क्लासचे विद्यार्थी आहेत, त्यांनी आमच्याच केंद्रात स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेतले, आमच्याच अभ्यासिकेमध्ये अभ्यास केला असे विविध प्रकारचे दावे क्लासेस व अभ्यासिकांकडून केले जात आहेत. काही क्लासेसनी त्यांच्या नावाचा वापर करून जाहिराती, फ्लेक्सबाजीही सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केलेली अभ्यासिकाही या जाहिरातबाजीमध्ये मागे नाही.
शहरात संदीप यांच्या नावाचा वापर करून क्लासेसची जाहिरातबाजी सुरू असताना संदीप यांना मात्र याबाबत कल्पना नाही. ज्यांचा कधीही संबंध आला नाही, ते लोक आपल्या यशामध्ये वाटा असल्याचे सांगत आहेत, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

‘माझी तयारी मीच केली’
‘‘चार वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पहिल्या वर्षी मी आकुर्डी-प्राधिकरण येथील ‘स्पर्धा यश अॅकॅडमी’ या एका क्लासचे मार्गदर्शन घेतले होते. त्यानंतर माझी मंत्रालयात सहायक म्हणून निवड झाली. या नोकरीनिमित्त मी मुंबईतच असल्यामुळे पुण्यातील क्लासेसचे मार्गदर्शन घेणे शक्य नव्हते. गेल्या वर्षीही माझी ‘अ’ वर्गाच्याच पदासाठी निवड झाली होती. या वर्षी पुन्हा उपजिल्हा निबंधक पदासाठी यावर्षी पुन्हा निवड झाली. राज्यसेवा परीक्षेची मी गेली चार वर्षे तयारी करत आहे. एकदा स्टडी सर्कलचा ‘मॉक  इंटरव्ह्य़ूव्ह’चा दिला.’’
– संदीप जाधव