पुरातत्त्व विभागाकडून संवर्धन

पुणे : विख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या तीन चित्रांच्या संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. वर्मा यांच्या मल्याळी स्त्री, सैरंध्री, दमयंती या प्रसिद्ध चित्रांसह काही युरोपीयन चित्रे, शिल्पांचे अत्याधुनिक पद्धतीने संवर्धन करण्यात आले असून, आता या चित्र-शिल्पांना नवी झळाळी प्राप्त झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील औंधच्या संग्रहालयातील चित्रठेव्याच्या जतन-संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाकडून करण्यात येत आहे. २०१७ पासून हे काम सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत वेगवेगळ्या काळातील चित्र, शिल्पांचे संवर्धन करण्यात येत आहे. राजा रवी वर्मा यांच्या चित्रांचे संवर्धन हा त्याच कामाचा एक भाग आहे. राजा रवी वर्मा यांची संवर्धन केलेली चित्रे १८९२ ते १८९४ या काळातील आहेत.

औंधच्या संग्रहालयातील चित्रठेव्याच्या संवर्धनाच्या कामाचे दोन टप्पे पूर्ण झाले. त्यात राजा रवी वर्मा यांच्या तीन चित्रांचाही समावेश आहे. या चित्रांना भेगा पडल्या होत्या, कोपरे खराब झाले होते. त्यामुळे चित्रांच्या गरजेनुसार त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली, तसेच लाकडी चौकडी नीट करण्यात आल्या. त्यामुळे आता चित्रांचे चांगल्या रीतीने संवर्धन झाले आहे, अशी माहिती प्रकल्पाचे काम करणाऱ्या संवर्धक मधुरा शेळके , अनंत शेळके  आणि कीर्ती एम. यांनी दिली.राजा रवी वर्मा यांच्या चित्रांसह काही युरोपीयन चित्रे, शिल्पांचेही संवर्धन करण्यात आले आहे. त्यात १५-१६ व्या शतकातील चित्रांचाही समावेश आहे. प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात आणखी काही चित्रे, शिल्पांवर काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील वेगवेगळ्या संग्रहालयातील चित्रे, शिल्पांचे संवर्धन करणे हे पुरातत्त्व विभागाचे काम आहे. संवर्धन हे अतिशय महत्त्वाचे काम असते. त्यासाठी आवश्यक तितका वेळ द्यायला हवा. त्यामुळे एकावेळी अनेक चित्रांच्या संवर्धनाचे काम एकत्रित हाती घेण्यापेक्षा मर्यादित संख्येने चित्रांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. राजा रवी वर्मा यांची चित्रे संग्रहात असणे ही जितकी अभिमानाची बाब आहे, तितकीच त्याची जबाबदारीही मोठी आहे. त्यामुळे चित्रांच्या संवर्धनासाठी या विषयातील तज्ज्ञांची निवड करून काम के ल्याने सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. चित्रांच्या संवर्धनाचे अकादमिक पद्धतीने काम देऊन त्या पद्धतीनेच ते होत असल्याचा आनंद आहे.

– डॉ. तेजस गर्गे, संचालक, पुरातत्त्व संचालनालय

औंध संग्रहालयाकडे बहुतांश चित्रे आणि शिल्पे आहेत. काळाच्या ओघात चित्रांवरच्या वॉर्निशच्या थराच्या आत बुरशी, रंगाचे पोपडे पडणे असे प्रकार होतात. त्यामुळे चित्रांना बाधा निर्माण होते. ही बाधा नाहीशी करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन होण्याची गरज आहे. संग्रहालयातील चित्रांचे पहिल्यांदाच शास्रोक्त पद्धतीने संवर्धन होत आहे. या कामामुळे चित्र, शिल्पांचे आयुष्य नक्कीच वाढले आहे. – उदय सुर्वे, अभिरक्षक, औंध संग्रहालय