पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या बाबा भिडे पुलाला तडे गेलेले नसून, केवळ पुलावरील डांबराच्या अस्तराला तडे गेले असल्याचे स्पष्टीकरण पुणे महापालिकेचे वाहतूक नियोजन विभागप्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी गुरुवारी दिले. या पुलाला तडे गेल्याची पोस्ट सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यावर महापालिकेकडून लगेचच स्पष्टीकरण देण्यात आले. त्याचबरोबर हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, असे पत्र महापालिकेने वाहतूक पोलिसांना दिले आहे.
खडकवासला धरणातून बुधवारी ३१ हजार क्सुसेक वेगाने पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या पुलावरील वाहतूक बुधवारी दुपारपासून बंद करण्यात आली होती. धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण कमी करण्यात आल्यामुळे बाबा भिडे पुलावरील पाणी ओसरले. त्यानंतर या पुलाच्या वरील भागात तडे गेल्याचे दिसले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केल्यावर पुलाच्या स्ट्रक्चरला तडे गेले नसून, केवळ पुलावरील डांबराच्या अस्तराला तडे गेले असल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेने या पुलावरून वाहतूक सुरू करावी, असे लेखी पत्र वाहतूक पोलिसांना दिले.