करोना काळ आयुष क्षेत्रासाठी लाभदायी ठरला आहे. आयुष क्षेत्राची जवळपास ४४ टक्के  वाढ झाली आहे. आयुष औषधे, औषधी वनस्पतींच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, अश्वगंधाची निर्यात तिपटीने वाढल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यांनी बुधवारी दिली.

विविध संस्थांच्या समावेशातून आयुष महासंघ स्थापन करण्यासंदर्भातील सामंजस्य करारानिमित्त कोटेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. करोना काळात केलेली संशोधने, आयुषचे महत्त्व अशा विविध विषयांवर त्यांनी माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन या वेळी उपस्थित होते.

कोटेचा म्हणाले, की करोना काळात विविध संस्थांच्या माध्यमातून आयुष संबंधित विविध संशोधने, सर्वेक्षणे करण्यात आली. आयुषच्या संशोधनांमध्ये पुणे हे महत्त्वाचे केंद्र होते. संशोधनांसाठी जवळपास १०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. हायड्रोक्सिक्लोरोक्विन, रेमडेसिवीरसारख्या औषधांचे गुणधर्म आयुर्वेदिक औषधांमध्ये असल्याचे संशोधनांतून दिसून आले आहे. आयुष औषधांच्या संशोधनालाही चालना मिळाली. त्यापैकी काही औषधांच्या चाचण्यांची प्रक्रिया सुरू आहे.

करोना काळात एकूण आयुष क्षेत्राचा मोठय़ा प्रमाणात फायदा झाला. आयुष क्षेत्राची जवळपास ४४ टक्के वाढ झाली. अश्वगंधाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे, तसेच अश्वगंधाची निर्यातही तिप्पट झाली. आयुर्वेदिक काढा, चूर्ण, च्यवनप्राशसाख्या उत्पादनांना मागणी वाढली. त्यामुळे आयुष कंपन्यांच्या उत्पादनांनाही कित्येक पटींनी मागणी वाढल्याचे कोटेचा यांनी स्पष्ट केले.

संशोधनाला चालना

येत्या काळात आयुष संबंधित शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन करण्यासाठी चालना दिली जाणार आहे. विज्ञान आणि नवसंकल्पनांचा आयुष हा मोठा भाग आहे. आर्थिक अंदाजपत्रकात आयुष मंत्रालयासाठी आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करण्यात आली आहे, असेही कोटेचा यांनी सांगितले.