जगभरात थैमान घालणाऱ्या कोरना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात झपाट्याने वाढत आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात करोनाबाधितांची संख्या कमालीची वाढली आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 91 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पाच जणांचा करोरनामुळे मृत्यू झाला आहे.

याचबरोबर पुणे शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 2 हजार 573 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत एकूण 149 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. 14 दिवसानंतर 69 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण 1 हजार 89 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत ७९१ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या १४ हजार ३५५ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ११० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन ५२८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात १२३० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर करोनाची लागण झाल्याने २४ तासात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या २३ हजार ४०१ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ८६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.