करोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांच्या मनात भीती असून आपल्याला त्याची लागण होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. लोक मोठ्या प्रमाणात मास्क आणि सॅनिटायजर विकत घेत आहेत. मात्र याचा फायदा घेत काहीजण काळा बाजार करत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात २७ लाखांचं बनावट सॅनिटायजर जप्त करण्यात आलं आहे. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, “पुण्यात गुन्हे शाखेकडून २७ लाखांचं बनावट सॅनिटायजर जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केलं असता सहा आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली”.

पुढे बोलताना त्यांनी माहिती दिली की, “परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाला २४ तास विलगीकरण कक्षात ठेवलं जाईल. गरज असल्यास त्यांना रुग्णालयात भरती केलं जाईल किंवा घऱात स्वतंत्र ठेवलं जाईल. जर ठरवून दिलेल्या दिवसांच्या आधी संबंधित व्यक्ती बाहेर आली तर कारवाई केली जाईल. परदेशातून येणाऱ्यांनी विलगीकरणाचे नियम तोडले तर कठोर कारवाई करणार आहोत. एका व्यक्तीसाठी पूर्ण समाजाला वेठीस धरणार नाही”.

“सर्व सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. पण अत्यावश्यक सुविधा असलेली कार्यालये सुरु राहतील. तसंच ३१ मार्चपर्यंत नवीन परवाने दिले जाणार नाहीत. आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे तेथील सर्व कार्यालये बंद करणार,” असल्याचं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं आहे.