करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ६० हजार विद्यार्थी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील मदतकार्यात सहभागी होणार आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी संबंधित अधिकारी आणि सदस्यांशी चर्चा करून या बाबतच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात संचारबंदीमुळे यंत्रणांना विविध कामे करण्यासाठी स्वयंसेवकांची गरज आहे. मदतकार्य करण्याचे काम प्रशासनावर येत आहे. त्यासाठी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे ६० हजार विद्यार्थी मदतीला उभे राहणार आहेत. हे विद्यार्थी विविध गोष्टींसाठी यंत्रणांना मदत करणार आहेत.

एनएसएसचे ६०० कार्यक्रम अधिकारीही त्यात सहभागी होणार आहेत. त्यात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, बँकांमध्ये त्यांच्या गरजेनुसार मदत, वंचित घटकांपर्यंत लाभ पोहोचवणे, पोलिस मित्र म्हणून पोलिसांना सहकार्य, रक्तदानासाठी फिरत्या गाड्या चालवण्यासाठी प्रशासनाला मदतीचे काम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केले जाईल.

सॅनिटायझर आणि मास्क निर्मिती –

विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि मास्क तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. त्याबाबतचे तंत्रज्ञान विद्यापीठाकडून पुरवले जाईल. त्यावरून विद्यार्थी ही उत्पादने तयार करतील. सध्या आरोग्यसेवकांना या गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे, भविष्यात त्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे ही उत्पादने तयार करून आरोग्य सेवकांना पुरण्याचे कामही विद्यार्थी करतील.

सहा लाख कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न –

एनएसएसचे६० हजार विद्यार्थी प्रत्येकी दहा गरजू कुटुंबांशी जोडले जाणार आहेत. त्याद्वारे तब्बल ६ लाख कुटुंब आणि तब्बल २५ लाख लोकांपर्यंत हे विद्यार्थी जोडले जाऊन त्यांच्या गरजा संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहेत. त्यातून संचारबंदीच्या काळात या घटकांच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत होऊ शकेल.

राज्य आणि देश मोठ्या आपत्तीशी लढत असताना विद्यापीठाने समाजात जाऊन थेट मदत करणे अपेक्षित आहे. याबाबत विद्यापीठाशी संबंधित सर्व अधिकारी, पदाधिकारी यांच्या सकारात्मक भावना आहेत. त्यामुळे हा ठोस कार्यक्रम घेऊन आम्ही समाजात जात आहोत. यंत्रणांवरचा ताण कमी करण्याचा आणि समाजाला दिलासा देण्याचा एक प्रयत्न असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले.