कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यातील ९४ कोटींची रोकड लूट प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींचा चेन्नईतील सिटी युनियन बँकेवरील झालेल्या सायबर हल्ल्यात सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत चार आरोपींनी तशी कबुली दिली आहे. यासंदर्भात काही महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत, असे सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांनी मंगळवारी सांगितले.

गेल्या वर्षी डिसेंबर २०१७ मध्ये चेन्नईतील सिटी युनियन बँकेचा सर्व्हर हॅक करून चोरट्यांनी ३३ कोटी रूपयांपेक्षा जास्त रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्यात सर्व्हर हॅक करून ९४ कोटी रूपयांची रोकड लुटल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने विशेष तपास पथकाची स्थापना केली. पोलिसांनी औरंगाबाद, नांदेड, मुंबई परिसरातून सात आरोपींना अटक केली आहे. सात आरोपींनी बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून विविध बँकांच्या एटीएम केंद्रातून रोकड काढून घेतली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराने त्यांना बनावट डेबिट कार्ड देऊन रोकड काढण्याच्या बदल्यात काही मोबदला दिल्याचा संशय आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेले शेख महंमद, फहीम खान, ऑगस्टीन वाझ उर्फ अँथोनी आणि नरेश महाराणा यांचा चेन्नईतील सिटी युनियन बँकेतील रोकड लूट प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सिटी युनियन बँक लूट प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी अटक झालेली नव्हती. या गुन्ह्यातील आरोपींचा माग काढणे तसे कठीण काम होते. पुणे पोलिसांच्या विशेष तपास पथकातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे सिटी युनियन बँकेचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे. बाहेरील राज्यात गुन्हा केल्यानंतर पकडले जाण्याची शक्यता कमी असल्याची आरोपींना खात्री होती. त्यामुळे त्यांनी चेन्नईतील बँकेचा सर्व्हर हॅक करून रोकड लुटली. देशातील अन्य शहरातदेखील बँकेचा सर्व्हर हॅक करून रोकड लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या अनुषंगाने पुणे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. त्यासाठी देशातील चार भागात तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांनी सांगितले.

तीन देशांकडून माहिती

कॉसमॉस बँक प्रकरणात आणखी चार ते पाचजण आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. कॉसमॉस प्रकरणात ७८ कोटींची रक्कम २८ देशातील एटीएम केंद्रातून काढण्यात आली आहे. संबंधित बँकांबरोबर पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे. फ्रान्स, हाँगकाँगसह तीन देशातील बँक आणि इंटरपोलच्या माध्यमातून काही माहिती घेण्याचे काम सुरू आहे.