पुण्यातील कॉसमॉस बॅंकेच्या सर्व्हरवर मालवेअर हल्ला करून तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये कॅनडा, हॉंगकॉंगसह २९ देशामध्ये वळवण्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली. या ९४ कोटी ४२ लाखांपैकी २ कोटी ५० लाख हे देशभरातील ४१ शहरामधील ७१ बँकांच्या एटीएममधून काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर मालवेअर हल्ला करून भारतासह २९ देशामधून विविध ठिकाणावरुन एटीएमच्या साहाय्याने ही रक्कम काढण्यात आली आहे. एवढ्या रक्कमेचा शोध घेण्यासाठी सायबर क्राईम पोलिसांवर जबाबादारी असून त्यासाठी त्यांनी एसआयटीची स्थापना केली आहे तसेच एसआयटीकडून करण्यात आलेल्या तपासात ९४ कोटी ४२ लाखांपैकी देशातील ४१ शहरामधील ७१ बँकांच्या एटीएममधून २ कोटी ५० लाख रुपये काढण्यात आले.

ही रक्कम काढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ४२८ एटीएम कार्डचा वापर केला गेला आहे. त्यामध्ये पुण्यातील १७१ एटीएम कार्डचा समावेश आहे. पोलीस यंत्रणेने केलेल्या तपासामध्ये आत्तापर्यंत ७ जणांकडून ३ लाख ५५ हजार रुपये जप्त केले असून या सात जणांपैकी दोन जणांनी सोमवारी पोलिसांकडे पैसे जमा केले आहेत तसेच ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत आणि त्यांनी पैसे काढले आहेत, त्या खातेदारांचा शोध देखील तपास यंत्रणा घेत आहे.