पुणे : विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठीचे धडे देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यापीठातील सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड  एंटरप्राईजेस आणि आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया एकत्र आले असून ‘उद्योजकता’ या विषयावरील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासह छोटय़ा कालावधीचे अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत.

नुकत्याच झालेल्या करारावेळी विद्यापीठाचे कु लगुरू डॉ. नितीन करमळकर आणि आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे संचालक मंडळ सदस्य मिलिंद कांबळे यांच्यासह प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, रीसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम आदी उपस्थित होते. आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे महासंचालक डॉ. सुनील शुक्ला, एस. बी. सरीन, डॉ. सत्य रंजन आचार्य या वेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला वाव देऊन नवीन उद्योजक तयार करण्यासाठी उद्योजकतेवरील ‘डिप्लोमा इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर मॅनेजमेंट’ हा एक वर्ष मुदतीचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने राबवला जाईल. या पदविका अभ्यासक्रमासह ‘उद्योजकता’ या विषयावरील छोटय़ा कालावधीचे अभ्यासक्रमही सुरू के ले जातील. तसेच नवउद्योजकांनाही विविध विषयांमधील प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे डॉ. पालकर यांनी सांगितले.

विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी हा विशिष्ट पदविका अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

प्रतिष्ठित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह जोडले गेल्याचा आनंद आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात प्राध्यापक विकास कार्यक्रम, अध्यापन प्रशिक्षण असे उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे.

– डॉ. सुनील शुक्ला, महासंचालक आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया