बाणेर रस्त्यावर माय-लेकींचे बळी घेणाऱ्या मोटारचालक महिलेविरुद्ध पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांकडून न्यायालयाकडे अर्ज सादर करण्यात आला आहे. या अर्जावर बचाव पक्षाने येत्या मंगळवारी (२५ एप्रिल) लेखी स्वरूपात म्हणणे मांडावे, असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांनी दिले.

बचाव पक्षाकडून अ‍ॅड. हर्षद निंबाळकर हे शनिवारी न्यायालयात हजर झाले. पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर २५ एप्रिल रोजी बचाव पक्षाकडून लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले.याप्रकरणी २६ एप्रिल रोजी बचाव आणि सरकार पक्षाकडून युक्तिवाद केला जाईल. त्यानंतर मोटारचालक श्रॉफ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे योग्य आहे की नाही, याबाबतचा निर्णय न्यायालयाकडून देण्यात येईल.

बाणेर रस्त्यावर दुभाजकावर थांबलेल्या पाजजणांना मोटारीने उडवल्याची घटना सोमवारी (१७ एप्रिल) घडली. अपघातात पूजा अजयकुमार विश्वकर्मा (वय २५, रा. धनकुडे हाईट्स, बाणेर) आणि त्यांची अडीच वर्षांची मुलगी इशा यांचा मृत्यू झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चतु:शृंगी पोलिसांकडून याप्रकरणी मोटारचालक सुजाता जयप्रकाश श्रॉफ (वय ५०, रा. आपटे रस्ता) यांच्याविरुद्ध हयगयीने आणि अविचाराने मोटार चालवल्याप्रकरणी (भादंवि ३०४ (अ)) गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यानंतर श्रॉफ यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून याबाबत न्यायालयाक डे अर्ज सादर करण्यात आला.