सात वर्षांपासून छळ सुरू होता; घरमालकीणीला खडकी पोलिसांकडून अटक

गेली सात वर्षे मालकिणीकडून होत असलेल्या छळाला अखेर वाचा फुटली. घरात कोंडून ठेवणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या मालकिणीच्या जाचातून मोलकरणीने स्वत:ची सुटका करून घेतली. खिडकीतून उडी मारून पळालेल्या मोलकरणीने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून मालकिणीला अटक केली. औंध रस्ता परिसरात नुकतीच ही घटना घडली.

सोनाली गजानन काळे (वय २४, रा. नाशिक ) हिने या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मालकीण सीमा हरीश आनंद (वय ४९, रा. गुरुअमृत सोसायटी, औंध रस्ता, खडकी) हिला अटक केली. तिच्याविरुद्ध मोलकरणीला मारहाण करणे, तिला डांबून ठेवणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास भोसले यांनी दिली.

सीमा आनंद यांनी सात वर्षांपूर्वी सोनाली काळेला नाशिकहून घरकामासाठी पुण्यात आणले. सुरुवातीला त्यांनी तिला मुलीप्रमाणे वागणूक दिली. त्यानंतर तिला घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. सोनालीने बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिला मारहाणदेखील केली जायची. सीमा बाहेर जाताना घराला बाहेरून कुलूप लावायच्या. सोनालीने विरोध केल्यानंतर तिला धमकाविले जायचे. तू चोरी केली आहेस, अशी तक्रार पोलिसांकडे करते, पोलीस तुला पकडतील, अशी धमकी तिला देण्यात आली होती.

त्यामुळे सोनाली गप्प बसून छळ सोसायची. तिला दरमहा फक्त एक हजार रुपये पगार दिला जायचा. त्यातील काही पैसे काढून घेतले जायचे. सोनालीला बुधवारी (६ जुलै) पुन्हा मारहाण करण्यात आली. अखेर या जाचातून सुटण्याचा निर्णय तिने घेतला. कोणाचे लक्ष नसल्याची संधी साधून तिने खिडकीतून उडी मारली आणि थेट खडकी पोलीस ठाणे गाठले. रडवेल्या सोनालीला धीर देत पोलिसांनी तिला बोलते केले. त्यानंतर सात वर्ष मालकिणीकडून सुरू असलेल्या छळाला वाचा फुटली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सीमा आनंद यांना अटक केली.

त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एम. ए. डोंगरे या प्रकरणात तपास करत आहेत.