वसईच्या पूर्व भागात अनेक कारखान्यांत सुरक्षेच्या उपाययोजना नाही; वर्षभरात ४० आगीच्या घटना

वसईच्या पूर्व भागात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा कारखाने उभे राहिले असून, त्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. या कारखान्यांमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याचे दिसून आले आहे. या कारखान्यांमुळे वर्षभरात ४० आगीच्या घटना घडल्या आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग जवळ असल्याने पूर्व भागात मोठय़ा प्रमाणत बेकायदा कारखाने उदयास आले. धुमाळनगर, नवजीवन, सातिवली, फादर वाडी, वालीव, गोलानी नाका या परिसरात मोठय़ा दाटीवाटीने हे कारखाने उभे राहिले आहेत. यातील काही कारखाने हे रसायने बनवण्याचे, यंत्रसामग्री जोडण्याचे काम करत आहेत. तर काही  कारखान्यांच्या लाकडाच्या वखारी आहेत. या कारखान्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून हे कारखाने सुरू आहेत.

या कारखान्यांमुळे या परिसरात आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. वर्षभरात ४०हून अधिक आग लागण्याच्या घटना या कारखान्यांमुळे घडल्या आहेत. मात्र महापालिका प्रशासनाने या कारखान्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. या परिसरात २००हून अधिक कारखाने आहेत. या कारखान्यांना महापालिकेची कोणतीही परवानगी नाही. या कारखान्यांची नोंदणीही झालेली नाही. अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्रही या कारखान्यांकडे नाही. मागील १० वर्षांत या कारखान्यांचे महापालिका अग्निशमन विभागाकडून कोणतेही लेखापरीक्षण झालेले नाही. यामुळे या परिसरावर सतत आगीचे संकट घोंगावत आहे.

रहिवाशांच्या जिवाला धोका

या परिसरात जुने रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एसी, भंगारामध्ये विकत घेऊन त्याची दुरुस्ती करून विकले जातात. तसेच पुठ्ठे आणि इतर मोठे स्टील आणि बफिंगचे कारखाने आहेत, त्याशिवाय लाकडाच्या वखारी आहेत. कोणतीही कायदेशीर परवानगी नसतानाही हे कारखाने वेल्डिंग, ब्लास्टिंग आणि आगीसंदर्भातील विविध कामे करतात. या कारखान्यात कोणत्याही आगीच्या सुरक्षात्मक यंत्रणा नाहीत. यामुळे या परिसरात सतत आगी लागत असतात. या आगींमुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

तक्रारीकडे दुर्लक्ष

धुमाळनगर शेजारी असलेल्या रश्मी पार्क या सोसायटीतील रहिवाशांनी अनेक वेळा या कारखान्यांसंदर्भात महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. पण त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. लोकांच्या जिवाला सतत धोका असतानाही पालिका कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

महापालिकेने या सर्व कारखान्यांना अग्निशमन चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आम्ही कारवाई करत आहोत. शासनाने नेमून दिलेल्या संस्थांकडून हे काम सुरू आहे, तसेच ज्या कारखान्यांनी ही चाचणी केली नाही. त्यांना पुन्हा नोटीस पाठवण्याचे काम सुरू आहे. – दिलीप पालव, मुख्य अग्निशमन अधिकारी, वसई-विरार महापालिका

 

या कारखान्यांमुळे आमच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या परिसरात कधी आग लागेल याचा भरवसा नाही. यामुळे आम्हाला सतत भीतीच्या छायेत राहावे लागते. – वेदप्रकाश आर्य, स्थानिक रहिवासी

या कारखान्याच्या संदर्भात आम्ही महापालिकेत अनेक वेळा तक्रारी केल्या, स्थानिक नगरसेवकांनाही माहिती दिली, पण अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. – समृद्धी कुबडे, स्थानिक रहिवासी