९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ
विशेष श्रेणी आणि ९० टक्क्य़ांपेक्षी जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील महाविद्यालयांचे अकरावीचे कट ऑफ या वर्षी साधारण २ ते ३ टक्क्य़ांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच ‘इन-हाऊस’ कोटा संस्थेच्या पातळीवर गृहित धरण्यात येणार असल्यामुळेही प्रवेशासाठीची स्पर्धा शिगेला पोहोचणार आहे.
या वर्षी ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे सीबीएसई शाळांचा निकालही चांगला लागला आहे. सीबीएसईच्या शाळेतून दहावी झालेल्या पन्नास टक्क्य़ांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्राधान्य हे अकरावीला राज्य मंडळाच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे असते. सीबीएसईच्या श्रेणीचे गुणांमध्ये रूपांतर केल्यानंतर ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ‘इन हाऊस’ कोटय़ाच्या बदललेल्या नियमामुळे महाविद्यालयांतील जागाही कमी झाल्या आहेत. नव्या नियमानुसार महाविद्यालय ज्या संस्थेचे असेल, त्या संस्थेच्या इतर कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थीही इन हाऊस कोटय़ातून प्रवेश घेऊ शकतात. या नियमामुळे बहुतेक महाविद्यालयांतील वीस टक्के जागा या निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांसाठीची स्पर्धा या वर्षी शीगेला पोहोचणार आहे. पुणे जिल्ह्य़ातील प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर वाढल्यामुळे विज्ञान शाखेबरोबरच वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठीही स्पर्धा असणार आहे.
नामांकित महाविद्यालयांसाठी प्रवेशाची चुरस असताना तळातील महाविद्यालयांची अवस्था मात्र वाईटच राहण्याची शक्यता आहे. गेली काही वर्षे अकरावीच्या साधारण ७ ते ८ हजार जागा रिक्त राहात आहेत. यावर्षी एकूण निकालाचा टक्का थोडा कमी झाल्यामुळे तळातील किंवा नव्या महाविद्यालयांना, काही महाविद्यालयांमध्ये कला शाखेच्या वर्गाना विद्यार्थी मिळवण्याचे आव्हान असणार आहे, असे प्रवेश समितीतील सदस्यांनी सांगितले.

अर्जाचा दुसरा भाग कसा भराल
अकरावीच्या प्रवेश अर्जाच्या दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. या भागांत विद्यार्थ्यांनी त्यांना दहावीला मिळालेले एकूण गुण, सर्वोत्तम पाच विषयांतील गुण भरायचे आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा त्या शाखांची नोंदही करायची आहे. विद्यार्थी एकावेळी दोन शाखांसाठी अर्ज करू शकणार आहे. अर्जाच्या याच भागांत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. मात्र त्यासाठी माहितीपुस्तकात उपलब्ध करून देण्यात आलेले महाविद्यालयांचे संकेतांक भरायचे आहेत. या वर्षी विद्यार्थ्यांना ५० महाविद्यालये प्राधान्यक्रमानुसार भरावी लागणार आहेत. त्यामधील सुरुवातीची ३० महाविद्यालये ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पसंतीच्या महाविद्यालयांची नोंद करायची आहे, तर पुढील वीस महाविद्यालये ही विद्यार्थी राहात असलेल्या झोनमधील द्यायची आहेत. अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने पुणे आणि पिंपरी-चिंचवडची ९ भागांमध्ये विभागणी करून झोन तयार केले आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेले प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांचे गुण आणि महाविद्यालयाचे गेल्या वर्षीचे कट ऑफ गुण यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळणार आहे.

अर्ज भरताना हे लक्षात ठेवा
* सर्व महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम विचार करून द्या.
* मिळालेले गुण आणि महाविद्यालयाचे कट ऑफ गुण यांची सांगड घालून प्राधान्यक्रम ठरवा
* महाविद्यालयाचे संकेतांक काळजीपूर्वक भरा.
* बहुतेक महाविद्यालयांचे अनुदानित आणि विनाअनुदानित तुकडी असे दोन प्रकार असतात. त्याच्या शुल्कामध्येही तफावत असते, त्याचप्रमाणे कट ऑफ गुण आणि संकेतांकही वेगळे असतात. त्याची पडताळणी करून मग प्राधान्यक्रम द्या.