16 February 2019

News Flash

मानवता, शांती आणि शाकाहाराचे प्रसारक

बालपणापासून बुद्धिवान असलेल्या दादांनी एम. एस्सी पदवी प्रथम क्रमांकाने संपादन केली.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : साधू वासवानी मिशनचे संस्थापक, सिंधी समाजाचे आध्यात्मिक गुरू हा लौकिक परिचय असलेले दादा वासवानी यांनी शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अनमोल योगदान दिले. मानवता, शांती आणि शाकाहाराचे प्रसारक या ध्येयासाठीच त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले.

अंगामध्ये पांढरा शर्ट-पायजमा, त्यावर ओढलेली पांढरी शाल, साधी चप्पल, हसरा चेहरा, चमकदार डोळे आणि मोठे कान, ही दादा जे. पी. वासवानी यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े. इंग्रजी आणि सिंधी भाषेवर प्रभुत्व. जगभरातील लेखकांच्या पुस्तकांतील परिच्छेदांचा उल्लेख करत आणि अगदी सोप्या इंग्रजीतून खणखणीत आवाजात संवाद साधणारे दादा श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेत. शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात योगदान देणाऱ्या दादांनी मानवता, शांती आणि शाकाहाराचा प्रचार हेच आपल्या जीवनाचे ध्येय मानले. बालपणापासून बुद्धिवान असलेल्या दादांनी एम. एस्सी पदवी प्रथम क्रमांकाने संपादन केली. ‘स्कॅटरी ऑफ एक्सरेज बाय सॉलिड’ या विषयावरील त्यांच्या प्रबंधाची नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी प्रशंसा केली होती.

साधू वासवानी यांच्यासमवेत १२ नोव्हेंबर १९४८ रोजी दादा भारतामध्ये आले. ‘इंडियन डायजेस्ट’ आणि ‘ईस्ट अँड वेस्ट सिरीज’ या मासिकांचे संपादन करणाऱ्या दादांनी १९६२ ते १९७६ या कालावधीत सेंट मीरा कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहिले.

दादांच्या पुढाकाराने २१ फेब्रुवारी १९७८ रोजी साधू वासवानी यांची समाधी साकारण्यात आली आणि १६ मार्च १९८४ रोजी साधू वासवानी आश्रमाची स्थापना करण्यात आली. १९८२ मध्ये पहिला परदेश दौरा करणाऱ्या दादांनी एप्रिल १९८२ मध्ये कोलंबो येथील जागतिक हिंदूू परिषदेमध्ये सहभाग घेतला होता. २५ नोव्हेंबर १९८६ या साधू वासवानी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘शाकाहार दिन’ (मीटलेस डे) ही चळवळ दादांनी सुरू केली. ९ जानेवारी १९८९ रोजी मदर तेरेसा यांच्या हस्ते इनलॅक्स अँड बुधराणी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले होते. साधू वासवानी मिशनची जगभरात ४१ ठिकाणी केंद्रे कार्यरत असून त्याद्वारे मानवता, शांती आणि शाकाहाराचा प्रसार केला जातो.

दादा जे. पी. वासवानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय व्यापारमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.

First Published on July 13, 2018 1:24 am

Web Title: dada vasvani valuable contribution in the field of education and medicine