पुणे शहरात मागील काही दिवसात करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच दरम्यान हडपसर भागातील प्रसिद्ध डेअरी मालकासह 11 कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाच्या डॉ. स्नेहल काळे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, हडपसर भागातील एका डेअरीच्या मालकाला करोनाची करोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणी नंतर स्पष्ट झाले. त्यामुळे यानंतर संबधित व्यक्तीच्या दुकानातील इतर कर्मचार्‍यांचीही करोना तपासणी केली गेली,  तर यामध्ये ते देखील  करोनाबाधित असल्याचे आढळून आले. सध्या या सर्वांवर उपचार सुरू आहेत, सर्वांची प्रकृती ठीक आहे. आता त्यांच्या डेअरीमधून ज्यांनी वस्तूचे खरेदी केली आहे. त्या ग्राहकांचा शोध घेण्यात येत असून त्यांची तपासणी करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.