धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात यंदा गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या चारही धरणांमध्ये मिळून एकू ण के वळ ८.६७ अब्ज घनफू ट (टीएमसी) पाणीसाठा असून गेल्या वर्षी १६ जुलैपर्यंत धरणांमध्ये १३.७८ टीएमसी पाणीसाठा होता.

गेल्या वर्षी लांबलेला पाऊस आणि यंदा ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे जूनच्या पहिल्याच आठवडय़ात झालेला वादळी पाऊस यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये १५ जून रोजी तब्बल सहा अब्ज घनफू ट (टीएमसी) पाणीसाठा होता. साधारणपणे मोसमी पाऊस सक्रिय होताना धरणांमध्ये एवढा पाणीसाठा नसतो. मात्र, त्यानंतर अद्यापही धरणांच्या परिसरात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांतील जुलै महिन्यातील सर्वाधिक नीचांकी पाणीसाठा यंदा धरणांमध्ये झाला आहे. दरम्यान, जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्ट महिन्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरतील, असा अंदाज जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत होता. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत धरणे काठोकाठ भरलेली होती. त्यामुळे जलसंपदा विभागाला यंदा शहरी आणि ग्रामीण भागाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करता आला. तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार वादळी पाऊस झाला. त्यामुळेही जूनच्या पहिल्याच आठवडय़ात धरणांमधील पाणीसाठय़ात वाढ झाली. त्यानंतर आतापर्यंत धरणांच्या परिसरात पाऊस पडत आहे. मात्र, संततधार पाऊस होत नसल्याने धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या पाच वर्षांतील १६ जुलैचा धरणांमधील पाणीसाठा

वर्ष               पाणीसाठा टीएमसीमध्ये

२०२०          ८.६७

२०१९          १३.७८

२०१८          १७.४२

२०१७          ११.२५

२०१६          १४.११