News Flash

माझ्या कामात कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती – द. भि.

मराठीतील लाखो वाचकांनी व माझ्या विद्यार्थ्यांनी माझे पोषण केले. माझ्या हातून जे काही काम झाले, ते केवळ साहित्यावरील प्रेमामुळेच झाले, त्यात कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती.

| July 26, 2014 02:45 am

मराठीतील लाखो वाचकांनी व माझ्या विद्यार्थ्यांनी माझे पोषण केले. माझ्या हातून जे काही काम झाले, ते केवळ साहित्यावरील प्रेमामुळेच झाले, त्यात कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती, असे मनोगत ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
साहित्य समन्वय महासंघाच्या वतीने दभिंच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते दभिंचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधवराव गाडगीळ, महासंघाचे कार्याध्यक्ष प्रमोद आडकर, प्रमुख कार्यवाह मंदा नाईक आदी या वेळी उपस्थित होते.
द. भि. म्हणाले, की माझ्या समीक्षेचे श्रेय माझे नाही. अनेक वर्षे विद्यार्थ्यांना विविध विषय शिकविले. त्यात महत्त्वाकांक्षा, ईर्षां नव्हती. प्रसिद्धी किंवा पुरस्कारांसाठी ते काम नव्हते. शब्द, साहित्य, कला हेच माझे जीवन अगदी बालपणापासूनच होते. घरातील वातावरण वाङ्मयीन होते. त्यामुळे मला वेगळी वाट शोधावी लागली नाही. त्यामुळे मी काही वेगळे करतो, असे काहीही नाही. मी जे काही केले ते साहित्यावरील प्रेमामुळेच.
शिंदे म्हणाले, की रक्तातून वाहणारे नातेवाईक दभिंनी जोडले. लेखनातील सौंदर्याची मीमांसा करणारे ते समीक्षक आहेत. सर्जनातील व मीमांसेतील सौंदर्य जाणणारे ते आहेत. त्यामुळे सौंदर्याच्या उपासकाचा हा सोहळा आहे.
कोत्तापल्ले म्हणाले, की दभिंचे बहुतांश लेखन सैद्धांतिक पातळीवरचे आहे. मराठीमध्ये आस्वादक समीक्षा मोठी आहे. त्या पाश्र्वभूमीवर सिद्धांत मांडू पाहणारे ते समीक्षक आहेत. या सिद्धांतांमुळे समीक्षेत भर पडत गेली. दभि सिद्धांताच्या पातळीवर वावरतात. सगळेच चांगले लिहितात, असे सततच म्हणणे योग्य नाही. त्यामुळे समीक्षकांनी अधून-मधून लेखकाला धोक्याचे कंदीलही दाखविले पाहिजेत. दभिंनी असे धोक्याचे कंदीलही दाखविले.
गाडगीळ म्हणाले, की साहित्याचा रसास्वाद कसा घ्यावा, हे दभिंनी मला व अनेकांना शिकविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आडकर यांनी, तर सूत्रसंचालन अंजली महागांवकर यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 2:45 am

Web Title: db kulkarni criticise literature
टॅग : Literature
Next Stories
1 …तरच जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई – गृहमंत्री
2 तेलंगणमधील भीषण अपघात ’
3 बांधकामांचा मलिदा
Just Now!
X