विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून आणि निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरू करता येतील, याचा निर्णय लवकरच घेऊ, असे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत शनिवारी सांगितले. तसेच करोनाच्या संकटकाळात काही खासगी रुग्णालयांकडून हलगर्जीपणा होत असून अशा रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी. या रुग्णालयांशी समन्वय ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करावेत, असे आदेशही पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्तालयात करोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी हे आदेश दिले. ते म्हणाले, ‘टाळेबंदीमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. उद्योगांना उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. रोजगार उपलब्धतेसाठी उद्योग, व्यवसाय सुरू करून स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे. यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील. ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ तसेच तातडीच्या साधनसामग्रीच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर असलेल्या प्रस्तावांना मंजुरी देऊ. राज्य शासनाचा आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल.’
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शनिवारी घेण्यात आला.
चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. सर्व बाधितांना जास्तीत जास्त मदत केली जाईल. १३ मे रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही पवार यांनी सांगितले.
‘चक्रीवादळामुळे जिल्ह्य़ात नजरअंदाजानुसार बाधित झालेल्या गावांची संख्या ३७१ असून शेतकऱ्यांची संख्या २८ हजार ४९६ आहे. एकूण बाधित क्षेत्र सात हजार ७८४ हेक्टर आहे. पॉलीहाउस व शेडनेटचे नुकसान झाले असून १००.५३ हेक्टर बाधित क्षेत्र आहे. ८७ गावांतील ३१७ पॉलीहाउस व शेडनेटचे नुकसान झाले आहे,’ असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या वेळी सांगितले.