News Flash

वाहनचालक परवान्याची मागणी क्षमतेच्या तिप्पट

पुणे शहरातून दररोज सुमारे चारशे नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने शिकाऊ वाहन परवान्यासाठी अर्ज केला जातो

वाहनचालक परवान्याची मागणी क्षमतेच्या तिप्पट
वाहन चालन प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचा कासारवाडी येथील अत्याधुनिक चाचणी मार्ग.

रोजची मागणी ४००, पण १२५ जणांच्याच चाचणीची क्षमता

पुणे शहरामध्ये वाहन चालवण्याचा परवाना काढणे सध्या एक दिव्यच झाले आहे. वाहन चालवण्याचा पक्का परवाना मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सद्य:स्थितीत वाहन चालवण्याच्या चाचणीची क्षमता लक्षात घेता त्या तुलनेत परवाना मागणाऱ्यांची संख्या तिपटीहून अधिक झाली आहे. शहरात दररोज ४०० नागरिकांकडून शिकाऊ परवाना काढला जातो. मात्र, पक्क्य़ा परवान्यासाठी रोज केवळ १२५ जणांचीच चाचणी घेतली जाते. त्यामुळे इतर नागरिकांना पक्क्य़ा परवान्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करण्याबरोबरच वेळ आणि पैसाही वाया घालवावा लागतो आहे.

वाहन चालविण्याचा पक्का परवाना देण्यासाठी पुण्यातील नागरिकांची चाचणी कासारवाडी येथील वाहन चालन प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयडीटीआर) अत्याधुनिक चाचणी मार्गावर घेतली जाते. या ठिकाणी अत्यंत कोटेकोरपणे वाहन चालविणाऱ्याची चाचणी घेतली जाते. संगणकाच्या माध्यमातून ही चाचणी होत असल्याने त्यात मानवी हस्तक्षेप नाही. या चाचणीतून योग्य पद्धतीने वाहन चालविणाऱ्यालाच परवाना मिळत असल्याने हा चाचणीमार्ग उत्तम असला, तरी पक्का वाहन परवाना मागणाऱ्याच्या तुलनेत त्याची क्षमता कमी आहे. त्याचा फटका थेट नागरिकांना बसतो आहे.

पुणे शहरातून दररोज सुमारे चारशे नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने शिकाऊ वाहन परवान्यासाठी अर्ज केला जातो. चारशे नागरिकांना दररोज शिकाऊ वाहन परवाना दिला जातो. शिकाऊ वाहन परवाना मिळाल्यापासून एक महिन्याच्या कालावधीनंतर पक्क्य़ा वाहन परवान्यासाठी अर्ज करता येतो. मात्र, महिन्याच्या कालावधीनंतर पक्क्य़ा वाहन परवान्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून चाचणी देण्यासाठी वेळ मिळविण्याचा प्रयत्न केल्यास बहुतांश नागरिकांना ती मिळत नाही. पुढील सुमारे दीडशे दिवसांपर्यंतच्या चाचणीच्या पूर्वनियोजित वेळा दिल्या जात नाहीत. त्यामुळे पक्क्य़ा परवान्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा शिकाऊ वाहन परवान्याची मुदत संपुष्टात येते. त्यामुळे पुन्हा शिकाऊ वाहन परवान्याची प्रक्रिया करावी लागल्यास नागरिकांचे पैसे आणि वेळही वाया जातो.

गेल्या आठवडय़ात पुणे शहरातून सहा हजार नागरिक पक्क्य़ा परवान्याच्या चाचणीसाठी प्रतीक्षेत होते. काहींच्या शिकाऊ परवान्याची मुदत संपत आली होती. त्यामुळे सुटीच्या दिवशी संबंधितांची पक्क्य़ा परवान्यासाठी चाचणी घेण्याची मागणी मोटार ड्रायव्हिंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती. ती पूर्ण करीत रविवारी आणि शनिवारी आरटीओने वाहन परवान्याचे कामकाज सुरू ठेवले होते. त्यामुळे समस्या तात्पुरती दूर झाली असली, तरी आता पुन्हा परवान्यासाठी प्रतीक्षेच्या रांगेत असणाऱ्यांची संख्या वाढ आहे. त्यामुळे चाचणीची क्षमतावाढ करावी आणि ती होईपर्यंत पूर्वीप्रमाणे खासगी वाहनांसाठी आळंदी रस्ता येथे वाहन चालविण्याची चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग असोसिएशनच्या वतीने परिवहन आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

आयडीटीआर येथील वाहन चालवण्याचा अत्याधुनिक चाचणी मार्ग उत्तम असून, त्याला विरोध नाही. मात्र, त्याची क्षमता कमी असल्याने पक्का परवाना मागणाऱ्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. सद्य:स्थितीत खासगी वाहनांच्या परवान्यासाठी दररोज २०० जणांची चाचणी आळंदी रस्ता येथे व्हावी. त्याचप्रमाणे आयडीटीआर येथे इतर आणि सुटीच्या दिवशी २०० जणांची चाचणी व्हावी.

– राजू घाटोळे, मोटार ड्रायव्हिग स्कूल असोसिएशन अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 2:52 am

Web Title: demand for driving license is tripled
Next Stories
1 प्रश्न विद्यार्थ्यांचे, उत्तरे नारळीकर सरांची!
2 पोलीस दलात हुशार उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी परीक्षेला प्राधान्य
3 पादचारी नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला पिंपरी पोलिसांनी केलं जेरबंद
Just Now!
X