नगर रस्ता, कोथरूड आणि संगमवाडी येथे आतापर्यंत संशयित डेंग्यूरुग्णांची सर्वाधिक संख्या आढळली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत नगर रस्ता भागात शहरातील सर्वात जास्त म्हणजे ८१ संशयित डेंग्यूरुग्ण सापडले होते, तर कोथरूड आणि संगमवाडी भागात अनुक्रमे ६९ व ६५ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत.
अधूनमधून पडणाऱ्या पावसाचे साचून राहणारे पाणी आणि बदलते हवामान या दोन्ही कारणांमुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून शहरातील संशयित डेंग्यूरुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात आढळलेल्या संशयित डेंग्यूरुग्णांची संख्या ७७३ आहे. यातील ७३५ रुग्ण केवळ जुलैपासून आतापर्यंत सापडले आहेत.
पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार ५ ऑक्टोबपर्यंतच्या नोंदीनुसार नगर रस्ता, कोथरूड आणि संगमवाडी या भागांत सर्वाधिक डेंग्यूसदृश रुग्ण सापडले. त्याखालोखाल वारजे (५६ संशयित डेंग्यूरुग्ण), घोले रस्ता (५३), टिळक रस्ता (५०), विश्रामबाग वाडा परिसर (४६), ढोले पाटील रस्ता (४०) या ठिकाणीही डेंग्यूचा प्रादुर्भाव लक्षणीय दिसून आला.
धनकवडी आणि बिबवेवाडीत आतापर्यंत शहरातील सर्वांत कमी डेंग्यूसदृश रुग्ण सापडले आहेत. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी १३ संशयित डेंग्यूरुग्ण सापडले असून भवानी पेठ (१७ संशयित डेंग्यूरुग्ण) व औंध (१८) या ठिकाणीही रुग्णसंख्या तुलनेने कमी आढळली आहे.
 
डासांची पैदास झालेली आढळल्यास नागरिक देखील पालिकेकडे तक्रार करू शकतात. त्यासाठीचे दूरध्वनी खालीलप्रमाणे-
१) नायडू रुग्णालयातील डेंग्यू निरीक्षण केंद्र (सव्र्हेलन्स सेंटर)- ०२०-२५५०६३०४
२) कसबा पेठ डेंग्यू निरीक्षण केंद्र- ०२०- २५५०८४७४
३) आपल्या भागातील क्षेत्रीय कार्यालय व पालिका इमारतीतील कीटक प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार करता येईल.