News Flash

न्यायवैद्यक दंततज्ज्ञ डॉ. हेमलता पांडे यांच्याशी गप्पांची संधी

‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर खास उपस्थिती

‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर खास उपस्थिती

पुणे : केस, बोटांचे ठसे, डीएनए चाचणीवरून गुन्हेगारांचा माग काढणाऱ्या फॉरेन्सिक तज्ज्ञांविषयी आपण ऐकलेले असते, मात्र दातांवरून गुन्हेगाराचा माग काढणाऱ्या डॉ. हेमलता पांडे यांची गोष्टच वेगळी आहे. दंतचिकित्सक म्हणून काम करत असताना फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजीचे शिक्षण घेत या क्षेत्रात प्रसिद्ध न्यायवैद्यक दंततज्ज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. हेमलता पांडे यांच्याशी संवाद साधण्याची संधी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’मधून मिळणार आहे.

महाराष्ट्रातील न्यायवैद्यक दंततज्ज्ञ, केईएम रुग्णालय, तसेच शेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमधील फॉरेन्सिक मेडिसीन खात्यात न्यायवैद्यक दंततज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. हेमलता पांडे ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. गुरुवार, २८ नोव्हेंबर रोजी पुण्यात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या एमईएस सभागृहात सायंकाळी ६ वाजता या आगळ्यावेगळ्या करिअरविषयीच्या गप्पा रंगणार आहेत. केवळ दंतचिकित्सक म्हणून आपली करिअरची वाट मर्यादित न ठेवता, त्यांनी वेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतले. डॉ. पांडे यांनी युनायटेड किंगडम येथून न्यायवैद्यक दंतशास्त्रमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. शिवाय, नायर रुग्णालयाच्या दंत महाविद्यालयात त्या हा विषय शिकवतात.

न्यायवैद्यक दंततज्ज्ञ म्हणून लैंगिक अत्याचार, बालशोषण, घरगुती हिंसा, खून अशा वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्य़ांच्या प्रकरणात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. या क्षेत्रावर त्यांचे इतके प्रभुत्व आहे की, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास प्रकरणांमध्येही त्यांनी न्यायवैद्यक दंततज्ज्ञ म्हणून मोलाची मदत केली आहे. फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी ही डीएनए प्रक्रियेच्या तुलनेत सर्वात वेगवान आणि स्वस्त प्रक्रिया आहे. मात्र, सध्या भारतात केवळ तीन ते चार न्यायवैद्यक दंततज्ज्ञ आहेत. या क्षेत्रात अधिकाधिक तज्ज्ञ निर्माण व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. पांडे यांनी सांगितले. या क्षेत्राविषयी अधिकाधिक विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी म्हणजे नेमके काय? या क्षेत्रातील करिअरच्या संधी इथपासून ते डॉ. पांडे यांचे या क्षेत्रातील अनुभव, त्यांचा अभ्यास, त्यांनी तपासलेली प्रकरणे अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याकडून जाणून घेण्याची संधी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या निमित्ताने मिळणार आहे. कार्यक्रमाला ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वाने प्रवेश देण्यात येणार असून काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असणार आहेत.

कधी – गुरुवार, २८ नोव्हेंबर

वेळ – सायं. ६ वाजता

कुठे – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, एमईएस सभागृह, मयूर कॉलनी, कोथरुड, पुणे.

डॉ. हेमलता पांडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 4:48 am

Web Title: dentist hemlata pandey in loksatta viva loung event zws 70
Next Stories
1 अत्याधुनिक पद्धतीच्या गावठाण मोजणीचा एक कोटी २० लाख घरमालकांना फायदा
2 पुणे रेल्वेमध्ये पहिल्यांदाच महिला व्यवस्थापकाची नियुक्ती
3 एक कोटी २० लाख घरमालकांना फायदा
Just Now!
X