काळाच्या आणि बदलत्या जीवनशैलीच्या ओघात अनेक लोककला लुप्त होत आहेत. या लोककलांचे जतन आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करणार आहे. ललित कलांच्या अभ्यासासाठी लौकिक मिळवलेल्या विद्यापीठात आता लोककलांचाही अभ्यास करता येणार असून त्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली.
गेली अनेक वर्षे कला आणि सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासामध्ये पुणे विद्यापीठ आघाडीवर आहे. विद्यापीठाचे ललित कला केंद्र हे देशभरात नावाजलेले आहे. त्याच्या जोडीला आता लोककलांचाही अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणार आहे. भारतातील लोककलांच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी विद्यापीठात आता स्वतंत्र विभाग सुरू होणार आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रमाबरोबरच पदविका, पदवी अभ्यासक्रम, संशोधन या विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लुप्त होत जाणाऱ्या लोककलांचे जतनही करण्यात येणार आहे. सध्या मुंबई विद्यापीठामध्ये लोककला केंद्र कार्यरत आहे. त्याच धर्तीवर पुणे विद्यापीठामध्येही हे केंद्र काम करणार आहे. विद्यापीठाच्या क्षेत्रात येणाऱ्या पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्य़ांमध्ये अनेक लोककला आहे. त्यांच्या अभ्यासापासून या केंद्राची सुरुवात होईल.
विद्यापीठाच्या गेल्यावर्षी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हे केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली होती. त्यानंतर विद्या परिषदेनेही त्याला मान्यता दिली. या शैक्षणिक वर्षांपासून या केंद्राचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर प्रशासकीय कारभारत या केंद्राचा प्रस्ताव अडकल्यामुळे ते प्रत्यक्षात सुरू झाले नाही. मात्र, आता या केंद्राला आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या असून त्याची रचना, कार्यक्षेत्र आणि नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, येत्या महिन्याभराच्या कालावधीत हे केंद्र सुरू होईल, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.

‘‘आतापर्यंत लोककला केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. येत्या महिनाभराच्या कालावधीत हे केंद्र सुरू होईल. सुरुवातीला विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या भागांतील लोककलांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल. त्यानंतर देशभरातील विविध लोककलांचा अभ्यास करता यावा, अशी साधनसामग्री या विभागामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. सुरुवातीला कमी कालावधीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याचा फटका त्याला बसणार नाही.’’
– डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर
टाईम्सकडून करण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या सर्वेक्षणात देशभरातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बाजी मारली आहे. जागतिक पातळीवर विद्यापीठ ६०० ते ८०० या क्रमवारीत आहे. अध्यापन, संशोधन, सायटेशन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अशा विविध मुद्दय़ांच्या आधारे विद्यापीठांची क्रमवारी ठरवली जाते. त्यानुसार अध्यापनासाठी विद्यापीठाने देशात दुसऱ्या क्रमांकाचे तर जगात १९१ व्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे.