करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचे दिसत असल्याने, आता अनेकांकडून निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जावी, अशी मागणी केली जात आहे. आम्ही त्याबाबतचा विचार करत आहोत, मुख्यमंत्री आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार करीत आहोत. त्याबाबत निश्चित सकारात्मक निर्णय घेऊ, असं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

पुणे शहर आणि जिल्ह्याची करोना आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर राज्यातील एकूणच परिस्थितीची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

यावेळी अजित पवार म्हणाले की, पुण्याचा करोनाबाधित रुग्णांचा दर ३.९ टक्के इतका असून १.६ टक्के इतका मृत्यू दर आहे. त्यामुळे आपण लेव्हल तीन मध्ये येत आहोत. तसेच येत्या काळात येणार्‍या तिसर्‍या लाटेचा विचार करता, सर्व तयारी करण्यात आली आहे. मात्र तिसरी लाट येऊच नये, अशी आमच्यासह सर्वांची भावना असून मात्र तरी देखील पुढील धोके लक्षात घेऊन, प्रशासन सज्ज आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, करोनामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. त्यातील एक म्हणजे दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू आहेत. तरी देखील मागील दरवाजाद्वारे दुपारनंतर दुकाने सुरू असतात हे सांगण्यात आले आहे. एका बाजूला रुग्ण संख्या कमी झाल्याने, व्यवहार सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आजच्या बैठकीत सर्वांनी केली आहे. या सर्व बाबींचा विचार करता, सोमवारपासून सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ आणि हा निर्णय सकारात्मक असणार आहे. अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

पुरात अडकलेल्या नागरिकांना तांदूळ, डाळ, रॉकेल आणि शिव भोजन थाळी देणार –

राज्यातील काही भागात पूरात अडकलेल्या नागरिकांची जेवणाची व्यवस्था व्हावी. त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्याशी बोलून, तांदूळ, डाळ, रॉकेल आणि शिव भोजन थाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
यावेळी अजित पवार म्हणाले की, मागील तीन चार दिवसांत राज्यातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्याच्या काही भागात जोरदार पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. तर गावच्या गावं पाणी खाली गेली आहेत. त्याच दरम्यान दरड कोसळून ७६ जणांचा मृत्यू, तर ३८ जण जखमी झाल्याची घटना देखील घडली आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे. २१ एनडीआरएफ पथकं कार्यरत असून, इतर १४ पथकांमध्ये आर्मी, नेव्हीचा समावेश आहे. ५९ बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. तब्बल ९० हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात यश मिळाले आहे. तसेच आणखी बचावकार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील पालकमंत्र्यांना तिथेच थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. आम्ही देखील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जर वेळ पडल्यास आपण स्वतः सातारा येथे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना सवलती देण्याचा विचार –

करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना काही सवलती देण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सवलत दिल्याने, ज्यांनी लस घेतली नाही ते देखील लस घेण्यास पुढे येऊ शकतील, असेही त्यांनी बोलून दाखवले.

डोंगराळ परिसरातील नागरिकांचे स्थलांतर –

राज्यातील दरड प्रवण क्षेत्राची राज्य शासनाकडे माहिती आहे. पण रायगड जिल्ह्यातील तळीये हा भाग हा दरड प्रवण क्षेत्रात येत नव्हता. अशी माहिती समोर आली आहे. मागील तीन चार दिवसांत दरड कोसळून नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटना लक्षात घेता, पुणे जिल्ह्यातील २३ गावांमधील जे नागरिक डोंगराळ परिसरात राहत आहेत. आमचं स्थलांतरित करा, अशी मागणी करीत आहे. त्यांना कशाप्रकारे स्थलांतरित करावे, त्या दृष्टीने विचार केला जात आहे. अशी देखील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.